जनतेने विचारपूर्वक लोकप्रतिनिधी निवडावा उपराष्ट्रपती

नवी दिल्ली – मतदान हा केवळ अधिकारच नव्हे, तर ती जबाबदारीही आहे. जनतेने लोकप्रतिनिधी निवडताना चारित्र्य, वर्तणूक, क्षमता लक्षात घ्यावी असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे. बेंगळुरू इथल्या विधीशाखेच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी आज उपराष्ट्रपती भवन इथे संवाद साधला, त्यावेळी त्यांनी हे आवाहन केले.

दुर्दैवाने काही जण जाती- जमाती, पैसा यांसारख्या बाबींना महत्व देत लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे सांगून जनतेने विचारपूर्वक लोकप्रतिनिधी निवडावा, असे आवाहन त्यांनी केले. निवडणुकीच्या तोंडावर केवळ लोकप्रिय घोषणा करण्यासंदर्भात त्यांनी राजकीय पक्षांना सावध केले आहे.

लोकसभा निवडणुकीबरोबरच राज्य विधानसभांच्या निवडणूका घेण्याला त्यांनी पसंती दर्शवली. न्याय प्रक्रिया अधिक जनस्नेही व्हावी, असेही ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात सुमारे 60,000 खटले प्रलंबित आहेत, तर उच्च न्यायालयात 44 लाख खटले प्रलंबित आहेत, असे सांगून प्रलंबित खटल्यांची संख्या कमी करण्यासाठी पावले उचलण्याची आवश्‍यकता त्यांनी व्यक्त केली.

त्यांनी अलिकडच्या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे विविध गुन्हे पुढे येत असून याकडे लक्ष देण्याची आवश्‍यकता असल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.