तुम्ही काहीही म्हणा, आमच्या अंगाला छिद्रं पडत नाहीत

– राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नरेंद्र मोदींवर टीकास्त्र
– भाजपचा पराभव हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य; कार्यकर्त्यांना आवाहन

पुणे – “स्वतःचे अपयश झाकण्यासाठी गांधी, पवार कुटुंबीयांवर हल्ले केले जात आहेत. मात्र, तुम्ही काहीही म्हणा, आमच्या अंगाला छिद्रं पडत नाहीत,’ अशा खरमरीत शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर देत भाजपचा पराभव हे प्रत्येकाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे,’ असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी येथे केले.
कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्रपक्षांतर्फे पुण्यात आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादीच्या खासदार ऍड. वंदना चव्हाण, कॉंग्रेसच्या सहप्रभारी सोनल पटेल, अनुसूचित जाती व जमाती आघाडीचे प्रमुख डॉ. नितीन राऊत, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, पालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, पी. ए. इनामदार, उल्हास पवार, अभय छाजेड, प्रवीण गायकवाड, बाळासाहेब शिवरकर, दीप्ती चवधरी, शहराध्यक्ष चेतन तुपे, प्रवक्ते अंकुश काकडे, विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, रविंद्र माळवदकर, कमल ढोले पाटील, बबन साळुंखे, हरीश चव्हाण आदी उपस्थित होते.

“कांद्याच्या किंमती पडल्याने शेतकरी स्वत:ला कांद्यात गाडून घेत आहेत,’ अशी खंत व्यक्त करत पवार म्हणाले, “सत्ताधाऱ्यांना सर्वसामान्यांच्या जीवाची भाजपला किंमत नाही. नोटाबंदीच्या रांगेत 100 जणांचे जीव गेले, 13 लाख रोजगार उद्‌ध्वस्त झाले. जिल्हा सहकारी बॅंकांना छळले. पुणे जिल्ह्यात एकही नवा कारखाना आलेला नाही,’ अशी टीका त्यांनी केली. रिझर्व्ह बॅंकेच्या, न्यायालयाच्या कामकाजात हस्तक्षेप केला जातो. सीबीआय प्रमुखाला हाकलले जाते. त्यामुळे लोकशाही संस्थांच्या प्रतिष्ठा आणि सार्वभौमत्वावर सरकारचा विश्वास राहिलेला नाही. उलट भाजप नेते राज्यघटना बदलण्याची भाषा करतात. मात्र, घटनेला हात लावल्यास देश पेटून उठेल, असा इशाराही त्यांनी दिला.
“मोदींच्या राजवटीत शेतकरी उद्‌ध्वस्त झाला असून शेतकऱ्यांना “साले’, “लावारिस’ म्हणणाऱ्या संवेदनाहीन राज्यकर्त्यांना बदलण्याशिवाय गत्यंतर नाही,’ असे ताशेरेही शरद पवार यांनी ओढले.

..अन्‌ सभागृहात एकच खसखस

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्ध्यातील सभेत पवार कुटुंबात गृहकलह असल्याची टीका केली होती. त्यावर “मोदींना कुटुंबाचा अनुभवच नाही’ असा पलटवार शरद पवारांनी केला. “मोदींच्या घरात कोणी नाही, जे आहेत, ते कुठे याचा पत्ता लागत नाही. कधीतरी फोटो पाहायला मिळतो. आता ते दुसऱ्याच्या घरची चौकशी करतात आणि लोक सांगतात, तुमची खास दोस्ती, तुमचे बोट धरून ते राजकारणात आले…’ असे पवार म्हणताच सभागृहात खसखस पिकली.

तर कुलभूषण जाधवला का आणले नाही?

“गुजरामध्ये विकासाचे मॉडेल उभे केले. त्यामुळे लोकांनी देशात नरेंद्र मोदींना संधी दिली. “पाकिस्तानने एक मारला तर तो आपण त्यांचे दहा मारू,’ असे मोदी सांगत होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांची सत्ता आल्यानंतर हल्ल्यांची संख्या वाढली. विगंकमांडर अभिनंदन हे पाकिस्तानमधून सुटून देशात आले. त्यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी “आमच्या शौर्याच्या राजकीय फायदा घेऊ नका,’ असे सांगितले होते. त्याचा उल्लेख करुन शरद पवार म्हणाले, “तुमची छाती जर 56 इंचाची आहे, तर कुलभूषण जाधवला सोडून का आणले नाही?’ असा सवाल त्यांनी केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.