पुणे – “तुम्ही मला फक्त सांगा, पैसे घेऊन काम करणाऱ्या सरकारी बाबूंना सुता सारखा सरळ करतो’, अशी तंबी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना दिली. बारामती तालुक्यातील एका गावात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल सुनावले आहे.
येथील प्रशासकीय भवनमध्ये कामासाठी पैशांची मागणी होते, अशी तक्रार एका जबाबदार नागरिकाने केल्याचे सांगत पवार यांनी याची गांभीर्याने दखल घेत अधिकाऱ्यांना गंभीर इशारा दिला. योग्य ती नियमांची आयुधे वापरुन याबाबत मी स्वतः पाठपुरावा करेन, असा इशारा त्यांनी दिल्यानंतर अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले.
बारामती तालुक्यातील एका गावात आयोजित कार्यक्रमात पवारांनी एका पत्राचे जाहिर वाचन करीत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. यावेळी ते म्हणाले की, रेकॉर्डरुमध्ये जुने फेरफार, सर्व्हे नंबर, दाखले काढण्यासाठी मागेल त्या रकमेची वसुली केली जाते, कामासाठी पंधरा दिवस वाट पाहावी लागते.
सॉल्व्हन्सीसाठी तसेच इतर कामासाठीही काही हजारांची मागणी केली जाते, हे बारामतीत घडतेय याचे दुःख होते. या पत्रात कितपत तथ्य आहे, काय चालले आहे, असा सवाल त्यांनी यावेळी केला. माझ्यापुढे सगळेच सुतासारखे वागतात. पण माझ्याही पाठीला डोळे नाहीत, जोपर्यंत तुम्ही सांगत नाही. मला तरी कसं समजणार काय सुरु आहे ते… अशा शब्दांत तंबी देत त्यांना चार गोष्टी समजून सांगून नाही ऐकले तर पुढची कारवाई करु ना…” असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.