- करोनाच्या पार्श्वभूमीचर पालिकेचा “एनआयव्ही’ला प्रस्ताव
- खासगी चाचण्या केल्यास दिवसाला 30 लाखांचा खर्च
पुणे – करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर दररोज किमान साडेआठ हजार करोनाच्या चाचण्या करण्याचे आदेश राज्य शासनाने महापालिकेने दिले आहेत. मात्र, शासकीय प्रयोगशाळांमध्ये सरासरी 1200 चाचण्या होत आहेत. त्या वाढवण्यासाठी महापालिकेस दिवसाला तीस लाख रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे “एनआयव्ही’ अर्थात नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीने मनुष्यबळ वाढवून चाचण्यांची संख्या वाढवावी, त्यासाठी कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास तयार आहोत, असे पालिकेने “एनआयव्ही’ला कळवले आहे.
शहरात करोनाची साथ गेल्या दीड महिन्यांपासून काहीशी ओसरली आहे. त्यामुळे सर्वच शासकीय प्रयोगशाळांनी करोना चाचण्यांच्या कोटा कमी केला आहे. करोना बाधितांचा उच्चांक असताना चाचण्यांची संख्या दररोजी साडेसात हजारांपर्यंत होती.
त्यात सर्वाधिक 1,500 चाचण्या एनआयव्ही, 550 बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, 250 चाचण्या आयसरकडून केल्या जात होत्या. याशिवाय महापालिका खासगी लॅबकडून सुमारे 200 ते 300 चाचण्या करून घेत होती. उर्वरित चाचण्या नागरिकच खासगी प्रयोगशाळेत करत होते. मात्र, आता नव्या बाधितांची संख्या कमी झाल्याने ससूनवगळता “एनआयव्ही’ आणि “आयसर’ने महापालिकेचा दररोजचा चाचण्यांचा कोटा कमी केला आहे. सध्या “एनआयव्ही’-550, आयसर- 160 चाचण्या करत आहे. तर ससूनमध्ये 600 चाचण्या होत आहेत.
नेमकी अडचण काय?
करोनाच्या चाचण्या वाढवण्यासाठी “एनआयव्ही’ने 6 महिन्यांच्या करारावर वैद्यकीय कर्मचाऱ्यांची अनेक पदे भरली. मात्र, आता साथ ओसरल्यानंतर या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. महाराष्ट्रात लोकसंख्येच्या तुलनेत सर्वात कमी चाचण्या होत असल्याने आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्ह्याला व मोठ्या शहरांना पुढील दोन महिन्यांत करोना चाचण्या वाढविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुण्यात दररोज 8 हजार चाचण्या करणे बंधनकारक आहे. मात्र, शासकीय चाचण्या 1200च होत असून 2 ते 3 हजार खासगी लॅबच्या चाचण्या आहेत. त्यामुळे पालिकेस दररोज चार हजार शासकीय चाचण्या करायच्या झाल्यास, अनेक ची क्षमता वाढविणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेक ने 1500 चाचण्यांसाठी आवश्यक कर्मचारी नेमावेत. त्यांचे वेतन देऊ, असा प्रस्ताव पालिकेने दिला आहे.