“तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण…”; देवेंद्र फडणवीस यांची सरकारवर सडकून टीका

मुंबई : राज्यात सध्या स्वबळावर निवडणूक जिंकण्याचा नारा दिला जात आहे. याच मुद्द्यावरून सरकारमध्ये धुसफूस सुरु झाली आहे.  दरम्यान, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष सत्तेचा मलिदा खाण्यासाठी एकत्र आहेत. सरकारच्या नाकर्तेपणामुळे जनतेचे नुकसान होत आहे. तुम्ही एकमेकांना जोडे मारा, हार घाला, पण जनतेचं हाल का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

शिवसेना-भाजप युती होणार का ही चर्चा केवळ माध्यमात आहे. देशाच्या लोकशाहीमध्ये महाविकास आघाडीसारखी सरकार जास्त काळ टिकत नाहीत, हे सरकार ज्यावेळी पडेल त्यावेळी आम्ही पर्याय देऊ, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. राज्याचे  पावसाळी अधिवेशन होऊच नये, यासाठी करोनाचे कारण दिले जात आहे, असा आरोप फडणवीसांनी केला.

जेव्हा जेव्हा अधिवेशन जवळ येतं, तेव्हा करोना वाढल्याच्या बातम्या किंवा भूमिका राज्य सरकारकडून केला जातोय. करोनाचा बहाना पुढे घेऊन राज्याचं अधिवेशनच घेऊ नये असा सरकारचा प्रयत्न आहे. केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

एकीकडे राज्यात हजारोंच्या संख्येने पक्ष कार्यालय उद्घाटन चालते. मग अधिवेशन का नाही, असा प्रश्न करत विरोधी पक्षाने विधीमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला. लोकशाहीची थट्टा सुरु असल्याने आम्ही बैठकीतून बाहेर पडलो, असे फडणवीसांनी सांगितले.

फक्त दोन दिवसांच अधिवेशन असताना राज्यातल्या प्रश्नांवर चर्चा कशी करणार? विशेष अधिवेशन करण्याची गरज असताना आहे ते अधिवेशनही घेणार नाही अशीच सरकारची भूमिका आहे. लोकशाही बासनात गुंडाळायची सरकारची कार्यपद्धती आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीवरून काहीच भूमिका नाही. संसदीय लोकशाहीत ही गंभीर बाब आहे. अर्निबंध प्रशासन आणि मंत्री यांच्यावर प्रश्न विचारायचेच नाहीत का? असे प्रश्न फडणवीसांनी उपस्थित केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.