इंटरनेट मायाजालाच्या मोहामुळे तुम्ही व्यसनाधीन बनले आहात!

– अर्जुन नलवडे

पुणे – तुम्ही रात्री झोपतेवेळी उशीशेजारी मोबाइल घेऊन झोपता का? तुम्ही सकाळी उठल्याबरोबर लगेचच मोबाईल ऑन करून पाहता का? तुम्ही घरात टिव्हीसमोर मोबाइल हातात घेऊन जेवता का? बाथरूममध्ये मोबाइलचा वापर करता का? तुम्ही दिवसभरात 3 तासाहून अधिक वेळ मोबाइलवर घालवता का? तुम्ही वेगवेगळ्या सोशल नेटवर्किंग साईट्‌सची सतत पाहणी करता का? या प्रश्‍नांची उत्तरे “हो’ असतील, तर तुम्ही इंटरनेटच्या व्यसनाला बळी पडता आहात.

सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्याच्या अतिवापराचे भयानक परिणाम व्यसनमुक्ती केंद्रांमधून पाहायला मिळत आहेत. कुठे प्रेक्षणीय स्थळी मोबाईलवर सेल्फी काढताना तरुण-तरुणींचे अपघात होताहेत, तर कुठे फेसबुकवर चारचाकीच्या 140 च्या स्पीडचे लाईव्ह करताना अपघात होताहेत. काही ठिकाणी पालकांनी मोबाईल काढून घेतला म्हणून काही मुलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तर, काही ठिकाणी मोबाईलद्वारे ज्येष्ठांची फसवणूक केली जात आहे, अशा अनेक घटनांमधून इंटरनेट व्यसनाधिनतेचे परिणाम दिसून येत आहेत. यामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना निदर्शनास येत आहे.

याविषयी केंद्रातील रुग्णांसोबत आलेले अनुभव कथन करताना डॉ. अजय दुधाणे म्हणाले की, सध्या फेसबुक, व्हॉट्‌सऍप, ट्‌विटर, इन्स्टाग्राम, यु-ट्यूब, लिंक्‍ड इन, गुगल, गुगल प्लस, ई-मेल आणि नव्याने दाखल झालेले विविध ऍप्स यांचा वापर जोमाने सुरू केला जात आहे. यातून प्रत्येक जण 24 तास ऑनलाईन व्यग्र असतो. त्यामुळे बहुतांशी लोक इंटरनेटच्या जाळ्यात नकळत ओढले जात आहेत. एकीकडे न्यायालयात ऑनलाईन व्हिडीओ करत घटस्फोट झाल्याचे वृत्त प्रसिद्ध होतात. तर, दुसरीकडे मोबाइलमुळेच पती-पत्नीत संशयी वृत्ती वाढल्यामुळे त्यातून पुन्हा घटस्फोटाची प्रकरणे घडत आहेत. बरेच जण प्रवास करण्यापूर्वी सोशल मीडियावर लोकेशन अपलोड करतात, त्यामधून घरफोडी प्रकरणे उजेडात आलेली आहेत. हे सगळे परिणाम इंटरनेटच्या व्यसनाधिनतेतून घडत आहेत. झोपडपट्टी भागात तसेच मध्यमर्गीय गटात तर, अल्पवयीन मुलांवर या मोबाइल वापराचा अत्यंत वाईट परिणाम होत आहे. आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

मुले व तरुणांवर होताहेत भयानक परिणाम
सध्या अनेक माता आपल्या तान्हुल्या बाळांपासून 7-8 वर्षांपर्यंतच्या मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी मोबाईलवर व्हिडीओ, कार्टून आणि गाणी लावून देत आहेत. त्यामुळे मुलांच्या मेंदू वाढीच्या प्रक्रियेमध्ये अडचणी निर्माण होत चालले आहे. मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, भविष्यात या मुलांच्या मेंदूवर आणि शरीरावर होऊ शकतो. तसेच तरुण व पुरुषांना इंटरनेटच्या माध्यमातून पॉर्न व्हिडीओ पाहण्याची इतकी सवय झाली आहे की, त्या सामाजिक वातावरणावर भयंकर परिणाम होत आहेत. यु-ट्यूबवर क्राइमच्या सिरीयल्स, तसेच वेब सिरीज पाहून तरुण गुन्हेगारीचे धडे घेत आहेत. बालगुन्हेगारीमध्ये मोबाईलचा वाटा फार असल्याचे दिसून आले आहे.

रुग्णांची वाढत चाललेली आकडेवारी
आतापर्यंत 200 रुग्ण इंटरनेट व्यसनाधीनतेसंबंधी भेटी देताहेत. 8 ते 16 वयोगतील 49 रूग्ण भेटी देताहेत. त्यामध्ये 27 पुरूष आणि 22 महिलांचा समावेश आहे. तसेच 16 ते 25 वयोगटातील 62 रुग्णांनी भेट दिलेली आहे, त्यामध्ये 21 पुरूष आणि 41 महिला आहेत. त्याचबरोबर 14 गृहिणींनी भेट दिली आहे. 27 ज्येष्ठ नागरिकांनी भेट दिलेले आहेत आणि 44 विवाहित जोडप्यांनी देखील इंटरनेट व्यसनासंबंधी भेट दिली आहे.

इंटरनेट व्यसनाच्या आहारी सर्वात जास्त तरूणपिढी बळी पडत आहे. पब-जी गेम खेळण्यात तरुण-तरुणी अडकत आहेत. त्यामुळे विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवतींचे मानसिक आरोग्य धोक्‍यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये आळशीपणी वाढत आहे. मनाची सुदृढता आणि मुलांची निर्णय क्षमता लोप पावत आहे. पालकांनी आपल्या मुलांकडे वेळीच लक्ष द्यायला हवे. कारण, त्या परिणाम भयानक आहेत. मुलांच्या मोबाईल वापरण्यावर पालकांनी विशेष नियंत्रण ठेवायला हवे.
– डॉ. अजय दुधाणे, अध्यक्ष, आनंदवन व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here