मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल खेडच्या गोळीबार मैदानावर उत्तरसभा घेतली. याच मैदानावर दोन आठवड्यांपूर्वी 5 मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपवर आसूड ओढला होता. त्याला आता मुख्यमंत्री शिंदेंनी उत्तर दिलं आहे. सभा घेऊन उद्धव ठाकरेंच्या सगळ्या आरोपांना जशास तसं उत्तर एकनाथ शिंदेंनी दिलं असून, अनेक मोठे खुलासे देखील यावेळी त्यांनी केले. या सभेच्या अनुषंगाने दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचं पाहायला मिळालं.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या विरोधातच कट कारस्थाने केल्याचा आरोप यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत सावलीसारखे उभे राहून शिवसेना वाढवणारे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांचा शिवाजी पार्कवर झालेल्या सभेच्या वेळी पाणउतारा केल्याचा उल्लेख त्यांनी यावेळी केला.
तसेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवसेनेत असताना त्यांच्या विषयी झालेलं कटकारस्थान यावर सुद्धा मुख्यमंत्री शिंदेंनी भाष्य केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले, “राज ठाकरे यांच्याविषयीहीतुम्ही असेच केलेत. राज यांनी राज्यातील ज्या भागात शिवसेना कमी आहे, तेथे मला शिवसेना वाढवायला द्या… तेथे मी शिवसेना वाढवतो.., असे सांगितले होते. त्यांचीही परिस्थिती तुम्ही कशी केलीत हे मला माहीत आहे..’ असं देखील शिंदे म्हणाले.
दरम्यान, कालच्या या सभेत योगेश कदम, उद्द्योगमंत्री उदय सामंत, गजानन कीर्तीकर, रामदास कदम, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भाषणे झाली. या सभेत ‘लावरे तो व्हिडीओ…’ म्हणत, मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे, अजित पवार, शरद पवार यांच्याबाबत केलेली व्यक्तव्ये उपस्थितांना दाखवली.