यू चेंज्ड मी

अगदी साध्या साध्या गोष्टी असतात; पण बहुतेकदा त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. खरं तर अशा लहानसहान गोष्टींमधूनच आपल्या सामान्य आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण होतात आणि आपलं आयुष्यच बदलून जातं. जीवनाकडे आपण अधिक निकोप व सकारात्मक दृष्टिकोनातून पाहू लागतो.

खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना नेण्या-आणण्याचे काम करणाऱ्या एका कॅब ड्रायव्हरचे एका प्रवाशामुळे कसे परिवर्तन होते, ते “यू चेंज्ड मी’ नावाच्या शॉर्टफिल्ममध्ये दाखवले आहे. मुंबईतल्या एका लहान चाळीत हा प्रौढ वयाचा ड्रायव्हर राहतो आहे. असाच आपला कसाबसा. खोलीतून निघतो, तेव्हा त्याच्या घरात दारापाशीच केर गोळा केलेला दिसतो. कपडे चढवतो आणि कॅबमध्ये बसतो. त्याच्या मोबाइलमध्ये राधिका आपटे या ऑफिसरचा पत्ता नोंदवलेला असतो. त्यानुसार तो तिथे पोचतो.

एक छान नीटनेटका पोषाख केलेली, हातामध्ये बऱ्याच फायली वगैरे घेतलेली एक प्रसन्न तरुणी गाडीत बसते. ती बसते तिथेच जवळ त्याचा एक शर्ट ठेवलेला असतो. खाली पाण्याची रिकामी बाटली, सिगारेटचे पाकीट पडलेले असते. ती त्याला विचारते, “तुम्हीच येणार रोज मला न्यायला-आणायला?’ तो वाकड्यात शिरून म्हणतो, “संध्याकाळी कळेल मला ते. पण तुम्हाला जर माझ्याबरोबर येण्यात काही अडचण असेल तर तुम्ही मेल करून तसे आमच्या बॉसना कळवू शकता.’ ती हसून म्हणते, “मी स्वच्छतेच्या बाबतीत जरा काटेकोर आहे.’ तो बेफिकिरीने म्हणतो, “स्वच्छच तर आहे गाडी!’

“तुम्ही ईमेल वगैरे वापरता? चांगले शिकलेले दिसता…’ त्याला उगाचच राग येतो. म्हणतो, “पदवीधर आहे मी. कॉम्प्युटर येतो. पण शिकलेल्या लोकांनी गाडी चालवायची नाही का?’ ती पुन्हा हसून म्हणते, “मी स्वच्छतेबद्दल म्हणतेय.’
दुसऱ्या दिवशी तो गाडीतला कचरा उचलून टाकून देतो. ताज्या पाण्याची बाटली भरून ठेवतो. ती गाडीत बसल्यावर म्हणते, “अरे वा! गाडी स्वच्छ केलेली दिसतेय.’ “पाणीपण भरून ठेवलेय चांगले.’ तो सौजन्यपूर्वक म्हणतो. हळूहळू त्यांच्या गप्पा सुरू होतात. ती त्याची चौकशी करते. कुठून आलात वगैरे… तोही सांगतो की, नोकरीत होतो पण पगार कमी. मग पैसे साठवून कॅब घेतली आणि हा धंदा सुरू केला. ती म्हणते, “तुम्ही एवढे शिकलात वगैरे. कोणता विषय आवडायचा?’
तो सांगतो, “भाषाविषय. कविता, कथा, लेख.’

“कविता वगैरे लिहिता?’ ती विचारते. तो म्हणतो, “आधी लिहायचो. आता…’ रोज तिला नेणे-आणणे, बोलणे… ड्रायव्हरच्या राहणीत, कपड्यालत्त्यात बदल होऊ लागतो. आता त्याचे घरही स्वच्छ, नीटनेटके, आवरलेले दिसू लागते. बाहेर पडताना चांगले, स्वच्छ कपडे घालतो. बूट चांगले पॉलिश करतो. आत बसण्यापूर्वी गाडी पुसून एकदम स्वच्छ करतो आणि मग आनंदानं गाडी सुरू करतो.

या फिल्मचे दिग्दर्शक, लेखक डॉ. आझाद जैन आहेत. ड्रायव्हरची भूमिका त्यांनी सुरेख केली आहे. विशेषतः सुरुवातीचे त्याचे गबाळे, बेफिकीर वागणे आणि नंतर सुसंस्कृत होत गेलेले त्याचे व्यक्‍तिमत्त्व यामधले फरक त्यांनी बारकाईने दर्शवले आहे. उदाहरणार्थ, अगदी सुरुवातीला तो जेव्हा कॅब घेऊन निघतो, तेव्हा अचानक सायकलवाला मधे येतो. हा त्याला एक कचकचीत शिवी देऊन पुढे निघून जातो. नंतरच्या वेळी मात्र तो सावकाश, काळजीपूर्वक गाडी चालवतो आणि आणीबाणीचा प्रसंग आलाच तर न चिडता सावरून घेतो.

अनेकदा दिग्दर्शकाने अशा बारीकसारीक जागा कलात्मकतेने भरलेल्या असतात. प्रेक्षकाला त्या हेरता आल्या पाहिजेत. आधी जेव्हा तो त्या ऑफिसरच्या स्टॉपवर येतो, तेव्हा तिच्याजवळ गाडी आणून मख्खपणे बसून राहतो. ही पुढे होऊन कॅबचे दार उघडू पाहते, तर त्याने ते आतून काढलेलेच नसते. ही खाटखुट करते, त्याच्याकडे पाहते, मग त्याच्या लक्षात येते. तो रुक्षपणे आतला खटका दाबतो. मग ही बाहेरून दार उघडून आत बसते.

शेवटी त्या दोघांमध्ये इतका सुंदर संवाद सुरू होतो की, तिच्या सहवासाने, त्याच्या वृत्तीत पुष्कळच बदल होतो. शेवटच्या प्रसंगी तर तो चक्‍क तिच्या ऑफिसपाशी गाडी थांबवतो. मग उतरून तिच्या दारापाशी येतो आणि अदबीनं कॅबचे दार उघडतो. ती त्याला म्हणते, “मी ऑफिसच्या कामासाठी काही दिवसांसासाठी बाहेरगावी जाणार आहे. त्यामुळे आता मी तुमच्या पिकअप-ड्रॉपला उद्यापासून नसणार. तुमच्यासाठी दुसऱ्या कुणाचे नाव सुचवले जाईल.’
तो नम्रपणे म्हणतो, “तुमच्याबरोबरचा माझा काळ फार चांगला गेला.’ ती म्हणते, “हो, माझाही. तुमच्या कविता मात्र ऐकायच्या राहिल्या.’ ती त्याला पेन देते आणि तिचा मेल आयडीही देते. म्हणते, “आता पुन्हा कविता लिहा आणि मला पाठवा. आपल्या गप्पांची मला आठवण येत राहील.’ कोणत्याही दोन चांगल्या माणसांमधला हा नातेसंबंध! आपापल्या मनात एकमेकांबद्दल सद्‌भावना ठेवून ते निरोप घेतात. एक दिवस अचानक तिला मेल येते. त्याची कविता असते,
तेरा किया खयाल तो रखने लगा मैं खुदका खयाल
तुम्हारी वजहसे मैं करने लगा हूँ खुदसे प्यार…

माधुरी तळवलकर

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.