बालभारतीच्या दहावीची ई-बुक्स
पुणे – महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने अर्थातच “बालभारती’ने इयत्ता दहावीची सर्व पाठ्यपुस्तके येत्या महिनाअखेरपर्यंत संकेतस्थळावर अपलोड करणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दृक-श्राव्य स्वरुपात दहावी सर्व पाठ्यपुस्तके “ऍप’द्वारे डाऊनलोड करून अभ्यासता येणार आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांना केव्हाही, कुठेही ऑनलाइन पाठ्यपुस्तकांमुळे अभ्यास करणे सोयीचे होणार आहे.
गेल्या चार-वर्षांपासून “बालभारती’कडून टप्प्याटप्प्याने सर्व इयत्तांची पाठ्यपुस्तके ऑनलाइन स्वरुपात उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. “बालभारती’ने ई-बुक्सच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. पहिल्यांदाच इयत्ता दहावीची सर्व पाठ्यपुस्तके ऑनलाइन स्वरुपात “बालभारती’च्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. यापूर्वीच दहावीच्या दहा विषयांची सर्व माध्यमांची तीन धडे “ऍप’द्वारे ऑनलाइन स्वरुपात संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आता येत्या डिसेंबर अखेरपर्यंत सर्वच धडे अपलोड करून दिले जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया वेगाने करण्यात येत आहे, अशी माहिती “बालभारती’चे संचालक विवेक गोसावी यांनी दिली.
विद्यार्थ्यांना “प्ले-स्टोअर’मधून बालभारतीची “ऍप’ डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी कोणतेही शुल्क राहणार नाही. त्यानंतर आपल्या मोबाइलवर ही पाठ्यपुस्तके दृक-श्राव्य स्वरुपात असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य पद्धतीने व हव्या त्या वेळेत अभ्यास करणे शक्य होणार आहे. किबहुंना धड्यातील आशयही व्यवस्थितपणे आकलन होणार आहे. त्यामुळे ई-बुक्स विद्यार्थ्यांच्या अभ्यासात उपयुक्त ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
आतापर्यंत 6 हजार जणांकडून ऍप डाऊनलोड
दहावीच्या इंग्रजी, मराठी व उर्दू माध्यमाच्या दहा विषयांची ऑनलाइन पुस्तकांसाठी आतापर्यंत 6 हजार 48 जणांनी हे ऍप डाऊनलोड केले आहे. त्यात इंग्रजी माध्यमातील 2 हजार 662 तर, मराठी माध्यमाची 3 हजार 166 आणि उर्दू माध्यमातील 218 जणांनी ही ऍप डाऊनलोड केल्याची माहिती बालभारतीकडून देण्यात आली.
तिसरी व बारावी अभ्यासक्रम बदलणार
यावर्षी इयत्ता तिसरी व बारावीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार असून,त्यानुसार पाठ्यपुस्तकाची छपाईचे काम सुरू आहे. ही सर्व पुस्तके बाजारात वेळेत उपलब्ध होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सर्व इयत्तांची पुन्हा छपाईचे काम सुरू असून, अशा पुस्तकांची संख्या 8 कोटींहून अधिक आहे.