राडारोडाही “पीएमआरडीए’ने उचलावा : पालिकेने हात झटकले
पुणे विद्यापीठ चौकातील पुलासाठी रक्कम देण्यालाही नकार
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि ई-स्क्वेअर हे दोन उड्डाणपूल पाडण्याचा आणि नवा उभारण्याचा खर्च तर “पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणा’ने (पीएमआरडीए) करावाच; शिवाय राडारोडाही त्यांनीच उचलावा असा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. एवढेच नव्हे, तर या सगळ्याचा 50 टक्के खर्च देण्यालाही नकार द्यावा, असा अभिप्रायही या प्रस्तावातून प्रशासनाने दिला आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाच्या निर्मितीसाठी विद्यापीठ चौक आणि ई स्क्वेअर चौकातील उड्डाणपूल अडथळा ठरत आहेत. त्यामुळे हे दोन्ही पूल पाडण्याचे नियोजन “पीएमआरडीए’कडून करण्यात आले आहे. तसा प्रस्ताव मान्यतेसाठी “पीएमआरडीए’ने राज्य सरकारच्या नगर विकास खात्याकडे पाठवला होता.
हे पूल महापालिकेच्या मालकीचे आहेत. त्यामुळे पूल पाडण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. त्यासाठीचा प्रस्ताव “पीएमआरडीए’ने महापालिकेकडे पाठवला होता. लॉकडाऊनच्या काळात हे पूल पाडण्याला परवानगी द्यावी, अशी विनंती या प्रस्तावात करण्यात आली होती. हे दोन्ही पूल पाडण्याला आणि त्या ठिकाणी नवीन पूल उभारण्याला राज्य सरकारने “पीएमआरडीए’ला नुकतीच मान्यता दिली आहे. हे दोन्ही पूल पाडून तेथे उभारण्यात येणाऱ्या दुमजली उड्डाणपूलाला सुमारे 274 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चाचा पन्नास टक्के भार महापालिकेने उचलावा, प्रकल्पासाठी राज्य सरकार कोणतीही आर्थिक मदत करणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. यावर सत्ताधारी काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
जागा पालिकेची, मग खर्च का द्यावा?
पूल पाडण्यासाठी तसेच त्या ठिकाणी नवीन दुमजली पूल उभारण्यासाठी जो खर्च होणार आहे त्यातील 50 टक्के रक्कम देण्याला महापालिका प्रशासनाने नकार दिला आहे. ही रक्कम प्रकल्पासाठी जागेच्या स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. कारण जागा महापालिकेच्या मालकीची आहे. त्यामुळे निम्मा खर्च देण्याचा प्रश्न नाही, असेही निविदेत स्पष्ट करण्यात आले आहे.