ग्लासगो – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्यात मंगळवारी पहिली औपचारिक बैठक झाली. यादरम्यान बेनेट पंतप्रधान मोदींना म्हणाले, तुम्ही आमच्या देशात खुप लोकप्रिय आहात, माझ्या पक्षात प्रवेश करा.
ग्लासगो येथे COP26 हवामान शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांची भेट घेतली. यादरम्यान, दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला आणि आधुनिक तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावर विचार विनिमय केला. हवामान शिखर परिषदेदरम्यान सोमवारी संक्षिप्त चर्चेनंतर पंतप्रधान मोदी आणि बेनेट यांची पहिली औपचारिक बैठक झाली.
सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओनुसार, बेनेट पंतप्रधान मोदींना म्हणाले, ‘तुम्ही इस्रायलमधील सर्वात लोकप्रिय व्यक्ती आहात.’ याला उत्तर देताना पीएम मोदी म्हणाले, ‘धन्यवाद, धन्यवाद.’ त्यानंतर बेनेट यांनी त्यांच्या यामिना पार्टीत सहभागी होण्याची पीएम मोदींना ऑफर दिली. दोन्ही नेत्यांनी हसतमुखाने हस्तांदोलन केले.