जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा किम जोंग यांची भेट घेणार

न्यूयॉर्क- जपानचे नवनियुक्‍त पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांची बिनशर्त भेट घेण्याची तयारी दर्शवली आहे. जपानचे नवीन पंतप्रधान म्हणून आपल्याला उत्तर कोरियाशी असलेले संबंध सुरळीत करण्यावर भर द्यायाच आहे. त्यामुळे आपण किम जोंग उन यांच्याशी कोणत्याही पूर्व अटीशिवाय भेट घेऊन चर्चा करण्यास तयार आहोत, असे सुगा म्हणाले. संयुक्‍त राष्ट्राच्या 75 व्या महासभेच्या निमित्ताने औपस्थित झालेल्या सुगा यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जपान-उत्तर कोरिया दरम्यानच्या जाहीरनाम्यानुसार जपानला उत्तर कोरियाबरोबरचे संबंध सुरळीत करायचे आहेत, असेही सुगा म्हणाले.

जपान आणि उत्तर कोरिया दरम्यान 2002 मध्ये झालेल्या द्विपक्षीय करारानुसार दोन्ही देशांनी आपापसातील अण्विक आणि क्षेपणास्त्र विषयक मुद्दे चर्चेद्वारे आणि सामोपचाराने सोडवण्याचे मान्य केले आहे. कोरियन द्विपसमूहाशी संबंधित मुद्दे आणि 1970, 1980 मध्ये उत्तर कोरियामध्ये अपहरण करण्यात आलेल्या जपानी नागरिकांच्या मुद्दयांवरही परस्पर सहमतीने तोडगा शोधण्याचेही या कराराद्वारे मान्य करण्यात आले आहे.

जपान आणि उत्तर कोरियादरम्यान विधायक संबंध निर्माण होणे हे दोन्ही देशांच्या फायद्याचे आहे. एवढेच नव्हे तर प्रादेशिक शांतता आणि स्थैर्य निर्माण होण्याच्या दृष्टीनेही ते फायद्याचे होईल, असे सुगा म्हणाले.

पुढील ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा टोकियोमध्येच भरवण्यात येतील. त्याच्या यशस्वी आयोजनावर आपण ठाम आहोत, असेही सुगा म्हणाले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.