यॉर्कर स्पेशालिस्टचे पदार्पण गाजले

कॅनबेरा –ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात आयपीएल हिरो ठरलेला यॉर्कर चेंडू टाकण्यात प्रसिद्ध असलेला टी. नटराजन याने पदार्पण केले. त्यानेही ऑस्ट्रेलियाचा बलाढ्य फलंदाज मार्नस लेबूशेन याला बाद करत पहिला एकदिवसीय बळी मिळवला. 

अखेरच्या सामन्यात प्रमुख खेळाडूंना विश्रांती देताना नटराजनसह शुभमन गिल, शार्दुल ठाकूर व कुलदीप यादव यांना संधी दिली गेली. यात आयपीएल स्पर्धेत यॉर्कर स्पेशालिस्ट ठरलेल्या नटराजनला एकदिवसीय पदार्पणाची संधी दिली गेली. इतकेच नव्हे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नटराजनला कॅप देत त्याचे स्वागत केले.

एकदिवसीय सामन्यांत भारताकडून पदार्पण करत असलेला नटराजन 232 वा खेळाडू ठरला. भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध कारकिर्दीची सुरुवात करत असलेला नटराजन अशी कामगिरी करणारा भारताचा चौथा खेळाडू ठरला. यापूर्वी जसप्रीत बुमराह, महंमद सिराज व विजय शंकर यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यांत पदार्पण केले होते.

नटराजनने 20 प्रथम श्रेणी सामन्यात खेळताना 64 तर, 15 लिस्ट ए सामन्यात 16 बळी घेतले आहेत. टी-20 सामन्यात त्याने 35 गडी बाद केल असून यंदा अमिरातीत झालेल्या आयपीएल स्पर्धेतही त्याने आपल्या वेगवान यॉर्कर्समुळे प्रसिद्धी मिळवली. त्याने या स्पर्धेत 18 बळी घेतले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.