Yogi Adityanath | Paper Leak Case | Yogi Sarkar – उत्तर प्रदेशमध्ये कॉन्स्टेबल भरती परीक्षा आणि आर ओ-एआरओ परीक्षेतील पेपरफुटी लक्षात घेता, योगी सरकार उत्तर प्रदेश सार्वजनिक परीक्षा अध्यादेश 2024 आणणार आहे.
याअंतर्गत पेपरफुटीप्रकरणी दोषी आढळल्यास जन्मठेप आणि एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला जाईल. या प्रस्तावाला योगी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
त्याचबरोबर पेपरफुटी किंवा अन्य कारणांमुळे परीक्षेवर परिणाम झाला असेल, तर त्यावर झालेला खर्च सॉल्व्हर टोळीकडून वसुली करून भरून काढला जाईल. तसेच, परीक्षेतील अनियमिततेमध्ये सहभागी असलेल्या कंपन्या आणि सेवा पुरवठादारांना कायमचे काळ्या यादीत टाकले जाईल.
मंगळवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४४ प्रस्तावांवर सहमती झाली आहे. बैठकीत राज्यातील वाराणसी, गोरखपूर आणि प्रयागराज या तीन मोठ्या शहरांच्या सीमा वाढवण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
त्यात बरेली विकास प्राधिकरणात ३५ महसुली गावांचा समावेश करण्यास मंजुरी देण्यात आली असून वाराणसी विकास प्राधिकरणात २१५ महसुली गावांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
तसेच लखनौ, प्रयागराज आणि कपिलवस्तु येथील पर्यटन विकासाच्या दृष्टीने, हेलिकॉप्टर सेवा चालविण्याकरिता हेलिपॅड्स खासगी गुंतवणूकदारांद्वारे विकसित आणि चालविण्यास मान्यता देण्यात आली.