लखनौ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5 ऑगस्टला अयोध्येत राममंदिराचा भूमिपूजन समारंभ होणार आहे. त्या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज येथे दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी रामजन्म भूमी स्थळाला भेट देऊन येथील व्यवस्थेची पाहणी केली व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
मुख्यमंत्री कालच अयोध्येत येणार होते. पण त्यांच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री कमला राणी वरुण यांचे करोनामुळे निधन झाल्यामुळे त्यांना काल येथे येता आले नव्हते. पण आज त्यांनी अयोध्येतील सर्व तयारीची पाहणी केली.
तसेच कार्यक्रमाच्या मुख्य स्थळीही भेट देऊन तेथील व्यवस्थेचेही अवलोकन केले. यावेळी त्यांच्या समवेत राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनीशकुमार अवस्थी, अयोध्येचे जिल्हाधिकारी अनुजकुमार झा, पोलीस महासंचालक दीपक कुमार हेही उपस्थित होते.