नवी दिल्ली – साध्वी प्रज्ञा सिंग यांनी शहिद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्यासंदर्भात केलेलं वक्तव्य न शोभणारे आणि संतापजनक असल्याची टीका एकीकडे विरोधी पक्षांकडून केली जात आहे. तर दुसरीकडे साध्वी प्रज्ञा सिंग यांना भाजप पक्षाचे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी पाठींबा दिला आहे.
दरम्यान, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एका नामांकित वृत्तवाहिनीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारले असता ते म्हंटले की, आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजप पक्षावर हिंदू दहशतवादाचा खोटा आरोप केला आहे. काँग्रेस पक्षाने संपूर्ण देशाची माफी मागायला हवी. तसेच साध्वी प्रज्ञा सिंह यांनी भोपाळमध्ये एका कार्यक्रमात शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त भाष्यावर भाजप पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे, जर पक्षाने माझ्यावर त्यांच्या प्रचाराची जबाबदारी सोपवली तर मी ते पार पाडेल.’असेही ते म्हणाले.
तत्पूर्वी, साध्वी प्रज्ञासिंह यांनी भोपाळमध्ये एका कार्यक्रमात शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी वादग्रस्त भाष्य केले होते की ‘हेमंत करकरे यांनी मला चुकीच्या पद्धतीने फसवले होते. मी त्यांना सांगितले होते कि, तुमच्या पूर्ण वंशाचा सर्वनाश होईल. बरोबर सव्वा महिन्याने सुतक लागते. ज्या दिवशी जेलमध्ये गेले होते त्याच दिवशी सुतक सुरु झाले. आणि बरोबर सव्वा महिन्यांनी दहशतवाद्यांनी त्यांना मारले.’