प्रचारासाठी योगी आदित्यनाथ आज मुंबईत

मुुंबईसह महाराष्ट्रात घेणार 4 सभा
मुंबई : विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर भारतीयांच्या मतांसाठी भाजपने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रचारात उतरवले आहे. आदित्यनाथांना भाजपने प्रचारासाठी आमंत्रण दिले असून ते उद्या, गुरुवारी मुंबई येत आहेत. मुंबईसह राज्यभरात त्यांच्या 4 सभा होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दसरा मेळाव्यात बोलताना आम्ही सत्तेसाठी रामाचा वापर करणार नाही, प्रभू रामचंद्राप्रमाणे वचनबद्ध राहा, असा भाजपाला टोला लगावला असतानाच आता योगी आदित्यनाथ त्यांना कसे प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणूकीसाठी विजयादशमीच्या मुहूर्तावर राजकिय पक्षांच्या प्रचाराचा नारळ फुटला असून प्रचाराला आता खऱ्या अर्थांने रंगत चढली आहे. भाजप, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडाला असतानाच यामध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भर पडणार आहे. भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उद्या, गुरुवारी मुंबईत येत आहेत. मुंबईत कुलाबा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार राहुल नार्वेकर यांच्या प्रचारासाठी काळाबादेवी येथे दुपारी 3 वाजता, तर कांदिवली येथील अतुल भातखळकर यांच्यासाठी सायंकाळी 6च्या सुमारास त्यांची जाहिर सभा होणार आहे.

मुंबईतील दोन सभांबरोबरच आणखी दोन सभा त्यांच्या राज्यात होणार आहे. हरिभाऊ जावळे यांच्यासाठी रावेर, तर परभणी येथे शिवसेना उमेदवाराच्या प्रचारसासाठी योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे. त्यामुळे योगी आदित्यनाथ काय बोलणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.