नवी दिल्ली – उत्तर प्रदेशात काही दिवसांपूर्वी गँगस्टर अतिक अहमद याची हत्या करण्यात आली. त्यानंतर देशभरात एकच गोंधळ उडाला. योगी सरकार आता अतिक अहमदच्या मालमत्तेवर बुलडोझर चालवत असल्याचं दिसून येत आहे. गेल्या 2 वर्षात अतिक अहमदची बहुतांश बेकायदेशीर मालमत्ता एकतर जप्त करण्यात आली आहे किंवा त्यावर बुलडोझरचा वापर करण्यात आला आहे.
प्रशासनाने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, अतिक अहमद यांची 1169 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. आणि हीच मालमत्ता मूळ मालकांना कायदेशीर रित्या परत करण्यात येत आहे.
एकेकाळी गरिबांच्या जमिनींवर माफिया कब्जा करणाऱ्या अतिक अहमद आणि अशरफची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. प्रयागराज येथील कोल्विन रुग्णालयाजवळ ही घटना घडली. या दोघांना तेथे वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना अचानक पोलिसांच्या वाहनांवर गोळीबार झाला. त्यात अतिक आणि अशरफचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ निर्माण झाली होती.
दरम्यान, गोळीबारात ठार झालेल्या अतिक अहमदने गरिबांची मालमत्ता धमकावून बळकावलेली होती. आता त्याच जमिनींवर योगी सरकारने गरिबांसाठी फ्लॅट तयार केले आहे. प्रयागराजमधील संगम नागरी भागात हे घरे बांधण्यात आली असून, येत्या दोन दिवसात या फ्लॅटसाठी तारखा देखील जाहीर करण्यात येतील. त्यामुळे आता लवकरच गरिबांना त्यांच्या स्वप्नातील घराच्या चाव्या मिळतील.
लॉटरीद्वारे हे फ्लॅट दिले जाणार आहेत. 1731 चौरस मीटर जागेवर हे 76 फ्लॅट तयार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वीच यासाठी एका आयोगाची स्थापना केली होती. यामुळे अतिक अहमदच्या दहशतीमुळे जमीन किंवा घर गेलेल्या पीडितांना हा एक मोठा दिलासा मिळाला असल्याचं दिसत आहे.