पाडळीचे योगेश ढाणे ऑस्ट्रेलियात बनले “आयर्नमॅन’

शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांपुढे ठेवला आदर्श

सातारा – अन्न व औषध प्रशासनातील राजपत्रित अधिकारी व पाडळी, ता. सातारा या गावचे सुपुत्र योगेश ढाणे यांनी आस्ट्रेलियातील बसेलटन येथे झालेली आयर्नमॅन स्पर्धा 14 तास 55 मिनिटे या विक्रमी वेळेत पूर्ण करत किताब पटकावला आहे. 17 तासांत पूर्ण करायची असलेली ही स्पर्धा तब्बल अडीच तास आधीच पूर्ण करून त्यांनी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांपुढे आदर्श ठेवला आहे.

आस्ट्रेलियातील बसेलटन येथे होणारी जागतिक दर्जाची आयर्नमॅन स्पर्धा आव्हानात्मक असते. यामध्ये 3.8 किमी अंतर समुद्रातून पोहणे, 180 किमी सायकलिंग व 42.2 किमी धावणे, असे तीन प्रकार 17 तासांत पूर्ण करायचे असतात. दि. 1 डिसेंबर रोजी झालेल्या स्पर्धेत भारताकडून योगेश ढाणे हे एकमेव ऍथलीट सहभागी झाले होते. ढाणे हे अन्न व औषध प्रशासनात अन्नसुरक्षा अधिकारी म्हणून ठाणे येथे कार्यरत आहेत. त्यांना लहानपणापासूनच व्यायाम, धावणे, पोहणे व सायकलिंगची आवड होती. आजही हा छंद त्यांनी जोपासला आहे. यापूर्वी त्यांनी सातारा, पुणे, मुंबई, गोवा येथे 28 अर्धमॅरेथॉन पूर्ण केल्या असून 2018 व 2019 साली मुंबई मॅरेथॉनही पूर्ण केली होती. मलेशिया व गोवा येथे आयर्नमन किताब पटकवणारे ते पहिले शासकीय अधिकारी ठरले होते. आस्ट्रेलियातील स्पर्धेसाठी त्यांनी जानेवारीपासूनच सराव सुरू केला होता.

अवघ्या 11 महिन्यांत त्यांनी हे शिवधनुष्य पेलले. त्यांना हैदराबाद येथील प्रशिक्षक सुनील मेनन यांचे मार्गदर्शन लाभले. फ्रान्सचे सहाय्यक प्रशिक्षक हेंझ आणि सातारा येथील जलतरण प्रशिक्षक सुधीर चोरगे व ओमकार ठेरे यांनीही त्यांना मार्गदर्शन केले. ढाणे यांनी पोहण्याचा सराव उरमोडी धरण व उरण येथे समुद्रात तर सायकलिंगचा सराव कराड-नाईकबा (ढेबेवाडी) मार्गावर केला. धावण्याचा सराव मुंबई व ठाणे येथे केला होता.

पहाटे 5 ते सकाळी 9 आणि सायंकाळी तर सुट्टीत पूर्ण दिवस सराव करत होते. आस्ट्रेलियातील आयर्नमॅन स्पर्धेत त्यांनी समुद्रातील 3.8 किमी अंतर एक तास, 31 मिनिटे, 10 सेंकदांत पोहून (आस्ट्रेलियन एक्‍झिट प्रकार) पार केले. त्यानंतर ट्रान्झिट एकसाठी दहा मिनिटे 52 सेकंद वेळ लागला. जोरदार वारे वाहत असलेल्या खडतर मार्गावरून सायकलिंगचे 180 किमी अंतर त्यांनी सहा तास 50 मिनिटांत पूर्ण केले.

ट्राझिट दोनसाठी दहा मिनिटे 42 सेकंद वेळ नोंदवली. पुढचे 42.2 किमी अंतर धाव सहा तास, 12 मिनिटे 17 सेकंदांत पूर्ण करून भारताचा तिरंगा आस्ट्रेलियात फडकवला. ही स्पर्धा पूर्ण करणारे ते राज्यातील पहिले शासकीय अधिकारी असून त्यांच्यावर क्रीडा क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे व सहकाऱ्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सौ. वेदांतिकाराजे भोसले, राजू भोसले, अन्न व औषध प्रशासनाचे उपायुक्त देसाई, सुरेश देशमुख, सातारचे सहाय्यक आयुक्त शिवकुमार कोटगिरे यांनी ढाणे यांचे अभिनंदन केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)