योगसाधना ही भारतीय संस्कृतीने विश्‍वाला दिलेली भेट

कोपरगाव -अष्टांगयोगी प.पू. आत्मा मालिक माऊलींच्या सान्निध्यात आज सर्वांना योग साधना करण्याची संधी मिळाली. योग साधना हा फक्त शारीरिक व्यायाम नाही तर समाधी अवस्थेपर्यंत पोहचून मोक्ष मिळविण्याचा मार्ग आहे. प्रत्येक जीवाला जीवनात शांती हवी असेल तर ध्यानयोग साधना करणे आवश्‍यक आहे.

आत्मविकास या मनुष्य जीवनाच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी ध्यानयोग महत्वाची आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीने मनुष्याच्या विकासासाठी “योगसाधना’ ही विश्वाला दिलेली भेट आहे, असे प्रतिपादन आत्मा मालिक ध्यानयोग मिशनचे तथा महाराष्ट्र योग असोशिएशनचे अध्यक्ष संत परमानंद महाराज यांनी केले.

आत्मा मालिक शैक्षणिक संकुल योग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक योग दिनाच्या कार्यक्रम ते बोलत होते.सुरवातीला प्रमुख पाहुणे आमदार स्नेहलता कोल्हे, शिर्डी संस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर, तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन झाले.

योग दिनाच्या निमित्ताने योगाचार्य योगानंद महाराज यांचे मार्गदर्शनाखाली उपस्थित मान्यवरांसह जवळपास 10 हजार विद्यार्थ्यांनी योगाची विविध प्रात्यक्षिके केली. आ. कोल्हे म्हणाल्या, समृद्ध जीवनासाठी व मनःशांती योगा अत्यंत महत्वाचा आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ योगामुळे चांगले आहे.

आत्मा मालिकमध्ये ध्यान योगाचे धडे दिले जातात. ध्यान-योगाच्या माध्यमातून चांगल्या कर्मासाठी संस्काराची रूजवणूक याठिकाणी केली जाते. ध्यानातून ऊर्जा मिळते तर योगातून मानसिक व शारीरिक स्वास्थ मिळते म्हणून प्रत्येकाने योगा करावा, असे आवाहन त्यांनी केले.

दीपक मुळगीकर म्हणाले की, शरीर, मन व आत्मा यांची संतुलित अवस्था योगामुळे तयार होते. योगामुळे विवेकी वृत्ती वाढते. सर्वांनी योगसाधना करावी व या योगसाधनेचा प्रचार व प्रसार करावा. यावेळी प.पू. आत्मा मालिक माऊली, संत परमानंद महाराज, संत निजानंद महाराज, संत मांदियाळी, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्‍वस्त प्रकाश भट, प्रकाश गिरमे, बाळासाहेब गोर्डे, वसंतराव आव्हाड, व्यवस्थापक हिरामण कोल्हे, सरपंच पोपट पवार, ग्रामस्थ शरद थोरात, दत्तात्रय लोढें, महेश लोंढे, आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे सर्व प्राचार्य विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक उपस्थित होते.

प्रास्ताविक प्राचार्य निरजंन डांगे यांनी केले. सूत्रसंचालन अजय देसाई यांनी केले. आभार प्राचार्य माणिक जाधव यांनी मानले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)