जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योग एक उत्तम मार्ग – राज्यपाल कोश्यारी

पुणे : संपूर्ण जग योगाकडे आकर्षित झाले आहे. मन नियंत्रित करण्यासाठी योग, दर्शन, शास्त्राची गरज आहे, असे सांगून जीवनात चांगला मनुष्य होण्यासाठी योग एक उत्तम मार्ग असल्याचे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते लोणावळा येथील कैवल्यधाम योगा संस्थेच्यावतीने देण्यात येणारा स्वामी कुवलयानंद योग पुरस्कार २०२० प्रदान करण्यात आले. अपर पोलीस महासंचालक डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांना योगाच्या प्रोत्साहन व विकासासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल तर योगाचार्या संध्या दिक्षीत यांना कैवल्यधाम योगा संस्थेतील सेवा व योगाच्या प्रसाराबद्दल सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. 

राज्यपाल  कोश्यारी म्हणाले, मनुष्य जीवनात विचार करत असतांना त्याला कोणत्याही शिक्षणाची गरज नसते. मनुष्य जसा विचार करतो तसे त्याचे मन कार्य करते. त्यामुळे चांगले विचार करा व त्या विचारानुसार कृती करा. जीवनात वाटचाल करतांना जो मार्ग तुम्ही निवडाल तो मार्ग सत्य आहे असे समजून त्यानुसार कर्म करणे आपला अधिकार आहे, असे राज्यपाल कोश्यारी यांनी म्हटले.

अपर पोलीस महासंचालक डॉ. उपाध्याय म्हणाले, योग ही देश, विश्व आणि संस्कृतीची ताकद आहे. योगामुळे शरीर, मन, चेतनांचा विकास होतो. वैद्यकीय विज्ञान क्षेत्रात योगाला महत्त्वाचे स्थान आहे. योग ही प्राणाची शक्ती आहे, असे डॉ. उपाध्याय यांनी म्हटले. योगाचार्या संध्या दिक्षीत यांनी पुरस्कार प्रदान केल्याबद्दल संस्थेचे आभार मानले.

राज्यपाल कोश्यारी यांनी संस्थेतील दार्शनिक साहित्य संशोधन विभागाच्या ग्रंथालयाची पाहणी करुन विभाग प्रमुख डॉ. राजेश्वर मुखर्जी यांच्याकडून ग्रंथालयाबाबत माहिती जाणून घेतली. त्यानंतर संस्थेतील परिसराची पाहणी केली तसेच स्वामी कुवलयानंद यांच्या समाधीचे दर्शन घेतले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.