नवी दिल्ली – ऍलोपॅथी आणि ऍलोपॅथिक डॉक्टरांवर आक्षेपार्ह विधाने केल्याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनने योगगुरू आणि व्यावसायिक रामदेवबाबा यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. त्यांनी 15 दिवसांत माफी मागावी अथवा एक हजार कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी या नोटिसीत केली आहे.
तर दुसरीकडे सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्यावर अखेर रामदेव बाबा यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे. रामदेव बाबा यांच्या वक्तव्यावरून अनेकांनी त्यांच्यावर कडाडून टीका केली. आता, बाबा रामदेव यांनी अभिनेता आमिर खान नंतर अक्षय कुमारलाही या वादात ओढून घेतलं आहे. त्यामुळे, हा वाद आणखीनच चर्चेचा विषय बनला आहे.
योगगुरु रामदेव यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत अभिनेता अक्षय कुमार आयुर्वेदावर बोलताना दिसत आहे. या व्हिडियोत अक्षय कुमार आयुर्वेदाला पाठिंबा देता आहे. यामध्ये ‘माझ्या फिटनेस सीक्रेट बाबत फार कमी लोकांना माहिती आहे. मी माझं फिट हेल्थसाठी गेल्या २५ वर्षांपासून आयुर्वेदला फॉलो करत आहे. निसर्गाने आपल्याला खूप मोठा आयुर्वेदीक खजाना दिला आहे. मात्र आपल्याला त्याचे महत्व नाही. अनेक जण इंग्रजांची औषधं आजही खातात आणि स्टेरॉयड इंजेक्शन घेताय. आपण इंग्रजांची उपचार पद्धती फॉलो करतो आणि ते लोकं आयुर्वेदात उपचार शोधत आहेत’, असं अक्षय कुमार त्या व्हिडिओत बोलत आहे.
दरम्यान, एलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केल्यानंतर योगगुरु रामदेव बाबा चांगलेच चर्चेत आले आहेत. याप्रकरणात IMA अर्थात इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेत रामदेवबाबांवर कारवाईची मागणी केली होती. तसंच 1 जून रोजी फेडरेशन ऑफ रेजिडेंट डॉक्टर्स असोसिएशन इंडिया (फोर्डा)ने रामदेव बाबा यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी काळ्या फिती लावून काम करण्याची घोषणा केलीय.
एलोपॅथी उपचार पद्धतीवर एका व्हॉट्सअॅप मेसेजआधारे केलेल्या वक्तव्याबाबत आपण माफी मागितली आहे. तसंच लोकांचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरांचे आभार मानले आहेत. इतकंच नाही तर एलोपॅथीमधील चांगल्या डॉक्टरांचा आपण सन्मान करतो. मग आयुर्वेदाचा अपमान का केला जात आहे? असा सवाल रामदेव बाबा यांनी केलाय.