मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर दौरा करत आहे. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. सदर पोस्टमधून त्यांनी शरद पवार यांच्याप्रति काळजी देखील व्यक्त केली. सोबत त्यांनी जनतेला सुद्धा आवाहन केलं आहे.
रोहित पवार म्हणाले,”लोकांच्या हितासाठी आदरणीय शरद पवार साहेब तुम्ही राज्यभर फिरतच राहणार. याबाबत कुणीही नाही म्हणलं तरी तुम्ही ते ऐकणार नाही. म्हणून मी लोकांनाच कळकळीची विनंती करतो की, साहेबांच्या दौऱ्यात त्यांना भेटत असताना स्वतःहूनच योग्य ते अंतर ठेवण्याची काळजी घ्यावी”
शरद पवार यांनी शनिवारी औरंगाबादचा दौरा केला. यासंदर्भातील माहिती आणि आढावा बैठकींचा तपशील पवार यांनीच ट्विटवरुन शेअर केला होता. सध्याची करोनाची परिस्थिती ही किल्लारी भूकंपापेक्षा खूप वेगळी आहे. 1993मध्ये किल्लारीत झालेला भूकंप हा एका जिल्हयापूरता मर्यादित होता. परंतु करोनाची स्थिती ही राज्यासह देशावर ओढावलेले गंभीर संकट आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले होते. या संकटाला सर्वांनी एकत्रितपणे सामोरे जाणे आवश्यक आहे. देशातील पाच-सहा राज्यांची स्थिती चिंताजनक असून यात महाराष्ट्राचाही समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.