कालचा गोंधळ बरा होता…; पुणे विद्यापीठाची अवस्था

ऑनलाइन परीक्षेत अडचणी असतानाही विद्यापीठाचा सुरळीत असल्याचा दावा

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षेत किरकोळ तांत्रिक अडचणी चौथ्या दिवशीही कायम होत्या. दुसऱ्याच विषयाचा पेपर दिसणे, प्रश्‍नाचे पर्यायच न दिसणे, लॉगिन खुली न होणे, या प्रकारास शुक्रवारी विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागले. दरम्यान, एवढे होऊनही ऑनलाइन परीक्षा सुरळीत होत असल्याचे विद्यापीठाचे म्हणणे म्हणजे कालचा गोंधळ बरा होता.., असे म्हणण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.

विद्यापीठामार्फत पदवी व पदव्युत्तरच्या अंतिम वर्ष विद्यार्थ्यांची परीक्षा होत आहे. ती ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने आणि वस्तुनिष्ठ स्वरुपात घेण्यात येत आहे. या परीक्षा 12 ऑक्‍टोबरपासून सुरू झाल्या आहेत. परीक्षेचा शुक्रवारी चौथा दिवस आहे. तरीही विद्यापीठाकडून सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्यात यश आले नसल्याचे स्पष्ट होत आहे. अजूनही तांत्रिक कारणाने योग्य पद्धतीने परीक्षा देता येत नसल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, ऑफलाइन परीक्षा सुरळीत सुरू होत आहे. त्याचप्रमाणे ऑनलाइनही तांत्रिक अडचणीविना सुरू व्हावी, अशी अपेक्षा पालक वर्गातून होत आहे.

दरम्यान, शुक्रवारी 60 हजार 822 विद्यार्थी ऑनलाइन परीक्षेसाठी, तर 15 हजार 196 विद्यार्थी ऑफलाइन परीक्षेसाठी अपेक्षित होते. त्यापैकी 54 हजार 384 विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे ऑनलाइन परीक्षा दिली. तर 13 हजार 501 विद्यार्थ्यांनी ऑफलाइन परीक्षा दिल्याची माहिती पुणे विद्यापीठाने दिली.

पाच विषयांच्या परीक्षेच्या तारखा जाहीर
विद्यापीठामार्फत दि. 13 ऑक्‍टोबर रोजी झालेल्या ऑनलाइन परीक्षेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे पाच विषयांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यांची परीक्षा 17 व 24 ऑक्‍टोबर रोजी, 3 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. एमएस्सी केमिस्ट्री – इनऑर्गनिक रिऍक्‍शन मेकॅनिझम, टीवायबीएस्सी – रिअल एनॅलिसीस, एमएस्सी मॅथेमॅटिक्‍स ऍडव्हान्स्ड कॅलक्‍युलस, एसवायबीकॉम- बिझनेस मॅनेजमेंट (मराठी) आणि टीवाय बीएस्सी – सॉलिड स्टेट फिजिक्‍स या पाच विषयांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाले आहे.

एजन्सीची चौकशी व्हावी…
पहिलीच ऑनलाइन परीक्षा असल्याने त्यात किरकोळ स्वरुपाच्या तांत्रिक अडचणी येणे समजू शकतो. मात्र सलग चौथ्या दिवशीही परीक्षेत तांत्रिक अडचणी येत आहे. त्यामुळे ऑनलाइन परीक्षेचे काम दिलेल्या एजन्सीची चौकशी झाली पाहिजे. त्याची नैतिक जबाबदारी विद्यापीठाने घ्यावी आणि तत्काळ दिलेल्या एजन्सीचे काम थांबवावे, अशी मागणी स्टुडंट हेल्पिंग हॅंडचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर यांनी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.