पुणे – सर्व्हर डाऊन, अपुऱ्या यंत्रणा, ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्रावर सुविधाच नाही अशी स्थिती लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशीही पाहायला मिळाली. त्यामुळे केंद्रांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आणि त्याची परिणती म्हणून अनेक ज्येष्ठ नागरिक संताप व्यक्त करत लस न घेताच तेथून बाहेर पडले.
केंद्र सरकारने 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील व्याधीग्रस्तांना करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्याची घोषणा केली असली, तरी पुण्यासह अनेक ठिकाणी लसीकरणाची यंत्रणा उभी राहू शकली नाही. पंतप्रधानांनी ही घोषणा केल्यानंतर “गाइडलाइन्स’ दिल्यावर यंत्रणा उभारण्यास वेळच मिळाला नाही. तसेच लसीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या “ऑनलाइन सिस्टिमचा सर्व्हर डाऊन’ होत असल्याने सलग दुसऱ्या दिवशीही मोठा गोंधळ उडाला. लसीकरणाच्या या गोंधळाचा “ज्येष्ठ’ नागरिकांना त्रास होत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सरकारी आणि महापालिकेच्या रुग्णालयात ही लस मोफत देण्यात येणार असून खाजगी रुग्णालयामध्ये 250 रुपये आकारून ही लस देण्यात येणार आहे. प्रत्यक्ष मोहीम सुरू होण्यापूर्वी चारच दिवस अगोदर ही घोषणा करताना लस घेणाऱ्यांसाठी को-विन 2.0 या ऍपवर नोंदणी अनिवार्य करण्यात आली. त्यात दोन दिवस सरकारी सुट्या आल्या.
त्यातच लसीकरण केंद्रावरही नोंद करण्याची सुविधा उपलब्ध करून लगेचच लसीकरण करण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. कोणते ऍप आहे, याची माहिती तर आदल्या दिवशी देण्यात आली. खासगी रुग्णालयांना ही लस केंद्र सरकारकडे ऑनलाइन पैसे भरल्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे. परंतू यासाठीही ऑनलाइन नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे.
अडचणी काय?
– सर्व्हर डाऊनमुळे लसीकरणाला विलंब.
– लसीकरण केंद्रांवर येऊन नोंदणी आणि तसेच ऑनलाइन नोंदणी अशा दोन्ही सुविधा दिल्याने केंद्रांवर – क्षमतेपेक्षा गर्दी वाढत आहे.
– ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाची घोषणा आणि प्रत्यक्षात लसीकरणाचा दिवस यामध्ये यंत्रणा उभारण्यास अवधीच न मिळाल्याने केंद्रांवर गोंधळ.
तातडीने लसीकरण केंद्र उभारा : आयुक्त
महापालिकेची रुग्णालये तसेच कोविड केअर सेंटरमध्येच लसीकरण केंद्र उभारण्याची तयारी सुरू आहे. परंतू सलग दुसऱ्या दिवशी सर्व्हर डाऊन झाल्याने ससून रुग्णालय, कमला नेहरू हॉस्पीटल, सुतार दवाखान्यात दुपारी बराचवेळ लसीकरण बंद होते. केंद्र उभारताना तेथे इंटरनेटसह संगणक, प्रिंटर सुविधा, नागरिकांना सावलीत बसण्यासाठी मंडप, पिण्याचे पाणी आणि अन्य व्यवस्था उभारण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी महापालिका आयुक्तांच्या उपस्थितीत 15 क्षेत्रिय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तातडीने सर्व सोयींयुक्त लसीकरण केंद्र उभारण्याचे आदेश दिले आहेत.