होय, आम्ही जादा पाणी उचलतो!

महापालिकेची कबुली : दोन वर्षांत वापरले 35 टीएमसी पाणी
 
पुणे – “गेल्या दोन वर्षांत प्रत्येक वर्षी खडकवासला धरणसाखळीमधील तब्बल 60 टक्के ( 17.50 टीएमसी) पाणी वापरण्यात आले आहे,’ याची लेखी कबुलीच महापालिका प्रशासनाने स्थायी समितीत पाणी करारासाठी ठेवलेल्या प्रस्तावात नमूद केली आहे. त्यामुळे केवळ 11.50 टीएमसी पाणीकोटा मंजूर असताना प्रत्यक्षात 17 टीएमसी पाणी वापरत असल्याचा पाटबंधारे विभागाकडून वारंवार करण्यात येत असलेला दावा खरा ठरला असून तो फेटाळून लावणारे महापालिका प्रशासन आपल्याच खुलाशाने तोंडावर आपटले आहे.

शहराला दरवर्षी 11.50 टीएमसी पाणी देण्याचा महापालिका आणि पाटबंधारे विभागात 2013 मध्ये करार झाला होता. याची मुदत फेब्रुवारी 2019 मध्ये संपली होती. त्यानंतर या करारास पुन्हा 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. तीदेखील संपल्याने महापालिका-पाटबंधारे विभाग कराराबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत ठेवण्यात आला होता.

यात प्रशासनाने गेल्या दोन वर्षांत महापालिकेने उचललेल्या पाण्याच्या माहितीसह यासाठी पाटबंधारे विभागाला भरलेल्या रकमेचीही माहिती दिली आहे. त्यानुसार महापालिकेने 2017-18 या वर्षात तब्बल 17.95 टीएमसी पाणी वापरले असून त्याच्या बिलापोटी तब्बल 27 कोटी रु.,तर 2018-19 मध्ये सुमारे 17.55 टीएमसी पाणी वापरण्यात आले असून त्या पोटी लागलेल्या दंडासह तब्बल 47 कोटी रुपये पाटबंधारे विभागास मोजण्यात आले आहेत. त्यामुळे पालिकेकडून गेल्या दोन वर्षांत पाटबंधारे विभागाशी झालेल्या कराराचा भंग करत तब्बल 6 टीएमसी अधिक पाणी उचलल्याचे स्पष्ट होत आहे. तर पाटबंधारे विभागाचा दावाही खरा ठरला आहे.

जादा पाण्यावर मोजावा लागतोय दंड
शहरासाठी वर्षाला सुमारे 17 टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यानुसार महापालिकेने शासनाकडे वाढीव कोट्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, तो अद्याप मंजूर झालेला नाही. त्यामुळे 2018-19 पासून पाटबंधारे विभागाकडून या वाढीव पाण्यावर दंड आकारण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे 2018-19 मध्ये पालिकेने घेतलेल्या तब्बल 6 टीएमसी जादा पाण्याची महापालिकेस पाण्याचे शुल्क तसेच दंडापोटी तब्बल 17 कोटींचा जादा निधी मोजावा लागला आहे. त्यामुळे शासनाने कोटा मंजूर करण्यासाठी महापालिकेकडून घाई सुरू असली, तरी पुरेसा राजकीय पाठबळ मिळत नसल्याने प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.