पुणे – जम्बो रुग्णालयात पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू प्रकरणाची ससून रुग्णालय समितीकडून चौकशी सुरू आहे. सोमवारी (दि. 7) चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर तात्काळ कारवाई केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तर, जम्बो रुग्णालयातील उपचार घेत असलेल्या रुग्णाची स्थिती नातेवाईकांना कळावी, यासाठी रुग्णालयाबाहेर स्क्रीन लावण्यात येणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील करोना साथीच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. जम्बो रुग्णालयासंदर्भात विविध तक्रारी आल्या असून, संबंधित एजन्सीला जमत नसल्यास नवीन टीम देण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचे पवार यांनी सांगितले. राज्यात बऱ्याच ठिकाणी ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा आहे, अशी कबुली देत राज्यातील ऑक्सिजनच्या एकूण उत्पादनापैकी 50 टक्के ऑक्सिजन रुग्णालय आणि उर्वरित उद्योगांसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.
केंद्रालाही ऑक्सिजन पुरवठा करण्याची विनंती केली असून, लवकरच हे संकट दूर होईल. तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, पोलीस यंत्रणा आणि मदत-पुनर्वसन विभागासह करोना संकटाशी लढणाऱ्या विभागांच्या गरजांचा आगामी अधिवेशनातील पुरवणी मागण्यात विचार करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
पुण्यातील लॉकडाऊन हटवण्याबाबत वेगवेगळी मतं होती. पुण्यात औद्यागिक क्षेत्र असून येथील कामगारांचा प्रश्न मोठा होता. मुंबईप्रमाणे टप्याटप्याने लॉकडाऊन हटवण्याचे नियोजन होते. परंतू, व्यापारी आणि व्यावसायिकांकडून सातत्याने लॉकडाऊन हटवण्याबाबत मागणी होत होती. पण अद्याप शाळा, मॉल्स, थिएटरसह अनेक बाबी बंदच आहेत.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री