मुंबई : राज्यातील मराठा आरक्षणाचा लढा अजूनही सुरु आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे हे 17 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा ते उपोषणाला बसणार आहे. यादरम्यान मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या स्थळीच आपणही उपोषण करणार असल्याचं ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले आहेत. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांनी अंतरवाली सराटीत घडलेल्या दगडफेकीच्या घटनेवर भाष्य करताना आमदार रोहित पवार आणि राजेश टोपे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ ?
छगन भुजबळ म्हणाले अंतरवालीत पोलिसांच्या कारवाईनंतर मनोज जरांगे तिथून निघून गेला होता. रोहित पवार आणि राजेश टोपे यांनी त्याला पुन्हा तिथं आणून बसवलं. जरांगे आल्यानंतर या दोघांनीही शरद पवारांनासुद्धा तिथं बोलावून घेतलं. शरद पवार यांचे नाव घेतले असले तरी शरद पवारांना तिथं काय घडलं याची कल्पना नव्हती असंही छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.
रोहित पवारांचा पलटवार
सामाजिक प्रश्नासाठी सामाजिक कार्यकर्ता लढत असताना राजकीय आरोप करून सामजिक कार्यकर्त्याची बदनामी करणे आपल्यासारख्या जेष्ठ नेत्याला शोभत नाही. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर 2 सप्टेंबर रोजी सरकारने अमानुष लाठीचार्ज केल्याने त्या भागात नागरिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण होते, त्यामुळे मी स्वतः रात्री अडीच वाजता जाऊन त्या भागातील हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली, धीर दिला. जरांगे पाटील यांच्या कुटुंबाला धीर दिला, यात चुकीचे काय आहे का? असे रोहित पवार म्हणाले. तसेच आपण मध्यरात्री 2.30 वाजता तेथे गेलो होतो हे रोहित पवारांनी मान्य केले.
छगन भुजबळांना दिले आव्हान
ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवणाऱ्या भाजपला टोकाचा विरोध करणारा आपल्यासारखा जेष्ठ नेता आज माझ्यावर तसेच राजेश टोपे यांच्यावर ‘ज्यांच्या सांगण्यावरून आरोप करत आहेत त्याच नेत्याच्या’ हातात आज गृहमंत्रालय आहे. त्यामुळे त्यांना सांगून माझ्यावरील आपण केलेले आरोप सिद्ध करून माझ्यावर कायदेशीर कारवाई करायला सांगा, हे माझे आपणास जाहीर आव्हान आहे, असे चॅलेंजच रोहित पवार यांनी छगन भुजबळ यांना दिलं आहे.