मुंबई – कोलकाता येथे झालेल्या देशातील पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यादरम्यान माजी कसोटीपटू व समालोचक संजय मांजरेकर याने सहकारी समालोचक हर्षा भोगले यांचा अपमान केला होता. त्यावरून बरीच चर्चा देखील रंगली होती, मात्र अखेर आपला इगो बाजूला ठेवताना मांजरेकर यांनी भोगलेंची माफी मागितली असून आता या घटनेवर पडदा पडला आहे.
या सामन्यादरम्यान गुलाबी चेंडूवरून मांजरेकर आणि भोगले यांच्यात वाद झाला. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. पण आता मला त्याबाबत पश्चात्ताप होत असून मी भोगलेंची माफी मागत आहे, अशा शब्दांत मांजरेकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यंदाचे वर्ष माझ्यासाठी क्रिकेट समीक्षक आणि समालोचक म्हणून खूप वाईट होते. भोगलेंबाबत मी केलेले विधान योग्य नव्हते. बोलताना माझा स्वतःवरचा ताबा सुटला, पण आता मी दिलगिरी व्यक्त करत आहे, असे मांजरेकर यांनी सांगितलं. दिवसरात्र सामना गुलाबी चेंडूने खेळवण्यात आला. पण हा चेंडू रात्री साईट होतो का, असा प्रश्न समालोचन करताना भोगलेंनी विचारला होता. भोगले यांच्या प्रश्नावर स्लिपमध्ये खेळाडूंनी झेल तर व्यवस्थित घेतले, त्यामुळे चेंडू साईट होतो का नाही हा मुद्दा होऊ शकत नाही असे म्हणाले होते. त्यावर खेळाडूंनाच याबाबत विचारले पाहिजे, असे भोगले म्हणाले तर त्यावर पुन्हा आम्हालाच विचारले पाहिजे कारण आम्ही क्रिकेट खेळलो आहोत.
मैदानात नेमके काय होते याची आम्हाला जास्त कल्पना आहे. 10-15 वर्षे क्रिकेट खेळल्यामुळे यावर मी अधिकारवाणीने बोलू शकतो, असे मांजरेकर म्हणाले. तर क्रिकेटची माहिती तसेच परिस्थिती समजण्यासाठी क्रिकेट खेळलेले असलेच पाहिजे हा निकष असू शकत नाही, असे हर्षा भोगले म्हणाले. पण तरीही मांजरेकर प्रतिक्रिया देतच राहिले त्यातच भोगलेंचा अपमान झाला. मात्र, आता यावर पडदा टाकताना मांजेकर यांनी बिनशर्त माफी मागितली आहे.