सहा महिन्यांपूर्वी अडीचशेच्या घरात व्यवहार करणारी व वर्षभरापूर्वी अनेकांच्या गळ्यातील ताईत असलेली व नंतर बत्तीस रुपयांवर भाव आल्यावर सर्वांनी नो म्हटलेली बॅंक म्हणजे येसबॅंक. मागील गुरुवारी एकाच सत्रात या शेअरचा भाव तब्बल 39 टक्क्यांनी वधारला होता. बॅंकेनं शेअरबाजारास कळवलेल्या वृत्तानुसार बॅंकेस 120 कोटी अमेरिकन डॉलर्स म्हणजे 84.84 अब्ज रुपयांचा खरेदीचा प्रस्ताव आलेला आहे.
प्रवर्तकांनी बॅंकेतील हिस्सा कमी केल्यानंतरच्या कटू आठवणी पुसण्यास अशा गोष्टींची नक्कीच मदत होणार असल्यानं या बॅंकेच्या शेअर्सनी उसळी मारली. परंतु दुसऱ्याच दिवशी म्हणजे 1 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालात 709 कोटी रुपयांची करतरतूद केल्यामुळं 600 कोटी रुपयांचा तोटा जाहीर करावा लागलाय. त्याचप्रमाणं अनुत्पादीत कर्जाचं जून तिमाहीतील प्रमाण 5 टक्क्यांवरून वाढून 7.39 टक्क्यांवर गेलंय.
अशा बॅंकेचा शेअर सर्वात जास्त व्यवहार झालेला शेअर ठरला आहे. एकूणच, कंपनीच्या दाव्यानुसार एकूण समोर असलेल्या 300 कोटी अमेरिकन डॉलर्सचे प्रस्ताव आणि बॅंकेची सध्याची परिस्थिती पाहता थोड्या पडझडीत योग्य भावात खरेदी केल्यास थोडक्या कालावधीत चांगला परतावा देणारी बॅंक म्हणून पाहता येऊ शकतं.