नवी दिल्ली : अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हरने मंगळावर एक मोठा शोध लावला आहे. रोव्हरला लाल ग्रहावर पिवळ्या रंगाचे शुद्ध सल्फर क्रिस्टल्स सापडले आहेत. पाण्याशिवाय अशाप्रकारचे सल्फर क्रिस्टल्स तयार करणे फार कठीण आहे. त्यामुळे रोव्हरच्या या शोधामुळे शास्त्रज्ञ आश्चर्यचकित झाले आहेत. खडकाच्या उघड्या भागाच्या मध्यभागी सल्फरचे पिवळे क्रिस्टल्स सापडले आहेत. क्युरिओसिटीचे प्रकल्प शास्त्रज्ञ अश्विन वासवडा यांनी सांगितले की, या शोधाची कोणालाच कल्पना नव्हती. त्यामुळे हा मिशनचा सर्वात मोठा शोध आहे.
अश्विन वासवडा यांनी सांगिले की, 30 मे रोजी मी आणि माझ्या टीमने रोव्हरने पाठवलेल्या प्रतिमा पाहिल्या. यावेळी चाकाच्या मार्गात एक खडक विखुरलेला दिसत होता. झूम करून पाहिल्यावर आम्हाला सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण पिवळ्या रंगाचे क्रिस्टल्स विखुरलेले दिसून आले. जेव्हा तपासणी केली तेव्हा ते शुद्ध सल्फर असल्याचे उघड झाले. त्यामुळे आम्हाला सर्वांना पुन्हा एकदा आर्श्चयाचा धक्का बसला. कारण सल्फर असलेला खडक हा साधारणपणे सुंदर, चमकदार आणि क्रिस्टलसारखा असतो, असे मत वासवडा यांनी व्यक्त केले.
वासवडा यांचे म्हणणे आहे की, मंगळावर सल्फर असणे सामान्य गोष्ट आहे, परंतु शुद्ध स्वरूपात सल्फर सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेडेस वॉलिस चॅनेलमधील सल्फरची जुळणी आणखी आश्चर्यकारक आहे. त्या भागातील खडक सल्फरने भरलेले असण्याची शक्यता आहे. पृथ्वीवरही, सल्फर अत्यंत दुर्मिळ परिस्थितीत तयार होतो. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या ठिकाणी शुद्ध सल्फर सापडण्याची शक्यता असते. त्यामुळे मंगळावर सल्फर शोधणे म्हणजे वाळवंटात पाणी शोधण्यासारखे आहे, असेही वासवडा यांनी सांगितले.
लवकरच पाण्याचे रहस्य उघड होईल
वासवडा म्हणाले की, मंगळावर कधीकाळी जीवसृष्टी होती की नाही हे शोधण्याचा अनेक दिवसांपासून शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत. परंतु आता सल्फरचा शोध लागल्याने जीवसृष्टी होती की नाही, हे त्यादृष्टीने मोठे पाऊल असू शकते. सल्फरची पाण्यातील इतर खनिजांशी प्रतिक्रिया झाल्यानंतर पाण्याचे बाष्पीभवन होते आणि सल्फेट तयार होतात. त्यामुळे या शोधामुळे मंगळावरील जीवनाचे रहस्य उलगडू शकते. कारण सल्फर हे जीवनासाठी आवश्यक असते आणि लाल ग्रहावर ते सापडल्याने त्या ठिकाणी जीवसृष्टी असल्याचे दर्शवते, असा विश्वास अश्विन वासवडा यांनी व्यक्त केला.