आजपासून पुन्हा जोर वाढणार
मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
पुणे – शहर आणि परिसरात गुरुवारी दिवसभर पावसाने उघडीप दिली होती. मात्र, रात्रीच्या दरम्यान जोरदार सुरुवात झाली होती. दरम्यान, शुक्रवारपासून पावसाचा पुन्हा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून शहराला यलो अलर्ट दिला आहे. तसेच 16 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशाराही दिला आहे.
शहरातील विविध भागांमध्ये गेल्या पाच दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर कडक ऊन आणि संध्याकाळी मुसळधार पाऊस, असे संमिश्र वातावरण अनुभवायला मिळाले. गुरुवारीही काहीशी अशीच परिस्थिती होती. दरम्यान, पुढील काही दिवसांत शहरात पाऊस पुन्हा सक्रिय होईल. तसेच 11 ते 16 सप्टेंबर या कालावधीत शहरात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला. गुरुवारी सकाळी 8:30 पर्यंत सुमारे 40 मिमी पावसाची नोंद झाली.
दरम्यान, हवामान विभागाने शुक्रवारी राज्याच्या 90 टक्के भागांत पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. यामध्ये पुण्यासह पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूरसह विदर्भातील मोठ्या भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये जोरदार पाऊस होईल, असेही सांगण्यात आले आहे.