नगर, (प्रतिनिधी) – गेल्या दोन तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. शुक्रवार (दि.२३) रोजी नगर शहरात दुपारी दोनच्या सुमारास पावसाचे आगमन झाले. सलाईनवर असणार्या खरीप हंगामातील पिकांना या पावसाने जीवदान मिळाले आहे.
नेवासा तालुक्यात ४४ मिमी, कोपरगाव तीलुक्यातील दहहिगाव मंडलात ४७ मिमी. राहाता तालुक्यातील पुणतांबा मंडलात येथे ३८ मिमी, चास, ३२, पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर ३० मिमी, चापडगाव २६.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
दरम्य़ान जिल्ह्यात हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
या पावसामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, बाजारी, कपाशी, तूर, मका यासह चारा पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी रिमझीम पाऊस होत होता. मात्र, मोठ्या पावसाची शेतकर्यांना प्रतिक्षा होती.
जुलै महिन्यात जिल्ह्यात सर्वदूर असा मोठा पाऊस झालेला नाही. अपवाद वगळता झालेल्या दमदार आणि पेरणी लायक पावसावर शेतकर्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या होत्या.
या पिकांना पावसाची मोठी प्रतिक्षा होती. मात्र, शुक्रवारी श्रीरामपूर, कोपरगाव, नगर, राहुरी, तालुक्यासह नगर शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली.
त्यामुळे या पावसाने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र काही भागात मुगाची तोड सुरु असल्याने मुग तोडणीची कामे थांबली आहेत.
दरम्य़ान भारतीय हवामान खात्याद्वारे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आला आहे. जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी यांनी केले आहे.
तसेच मेघगर्जनेच्या वेळी विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये.
गडगडाटाच्या वादळादरम्यान व विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा,. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांच्यापासून दूर रहावे.
मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत, दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मरजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या, लोंबणाऱ्या केबल्सपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले.