जेजुरी – महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाचे मंदिर शासनाच्या सूचनेनुसार सहा महिन्यानंतर म्हणजेच गुरुवारी (दि.7) घटस्थापनेच्या दिनी भाविकांना देवदर्शनासाठी खुले होणार आहे;
मात्र प्रशासन आणि देवसंस्थानच्या वतीने घालून दिलेल्या नियम व सूचनांचे काटेकोर पालन भाविकांनी करावयाचे आहे. मंदिर खुले होताना मल्हार भक्तांना फक्त मुखदर्शन घेता येणार आहे. त्यासाठी सोशल डिस्टसिंगचे नियम पाळून दर्शन रांगेचे नियोजन करण्यात आले आहे.
स्वयंचलित सॅनिटायझर बूथ उभारण्यात आला आहे. दिवसभरात किमान 5 ते 6 वेळा मंदिर परिसर, दर्शन रांग, गडकोट परिसरामध्ये जंतूनाशक औषध फवारणी करण्यात येणार आहे.
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशाच्या अधीन राहून यावर्षी नवरात्र आणिदसरा उत्सव गडकोट आवारातच पारंपरिक, धार्मिक विधिनुसार आठवडेकरी पुजारी, (वीर कोळी घडशी, गुरव) नित्य वारकरी, सेवेकरी या मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये साध्या पद्धतीने साजरा होणार आहे.
कोणत्याही प्रकारचा कुलधर्म, कुलाचार करण्यास मनाई असेल. रोज किमान 20 हजार भाविकांना मुखदर्शनाचा लाभ घेता येणार आहे. देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मास्कचा वापर करावा. उत्तरबाजूकडील प्रवेशद्वारातूच प्रवेश करावा आणि बाहेर जाण्यासाठी पश्चिम दरवाजाचा वापर करावा.
हात सॅनिटायिझ केल्यानंतर प्रत्येक व्यक्तीमध्ये किमान तीन मीटरचे अंतर ठेवण्यात येणार आहे. मंदिर परिसरामध्ये कोणत्याही ग्रंथ, पुतळे, वा मूर्तींना स्पर्श करू नये. मंदिर परिसरामध्ये भंडारा-खोबरे उधळण्यास मनाई आहे.
10 वर्षांच्या आतील मुले, 65वर्षांच्या वरील वृद्ध, गर्भवती, आजारी व्यक्ती, रेड झोन, कॅन्टोन्मेंट झोनमधील नागरिकांना मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही, अशी सर्वसाधारण प्रशासनाकडून नियमावली करण्यात आलेली असून भाविकांनी सहकार्य करून देवदर्शन करावे असे आवाहन प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे-पाटील यांनी केले आहे.