येडियुरप्पांनी विश्‍वास ठराव जिंकला

बेंगळूरु – कर्नाटकातील बी.एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या तीन दिवसांच्या सरकारने विधानसभेत आवाजी मतदानाने विश्‍वासदर्शक ठराव जिंकला आहे. 17 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवल्यामुळे भाजपसाठी सभागृहामध्ये बहुमत सिद्ध करणे सोपे झाले होते. कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने विश्‍वासदर्शक ठरवावर मतविभाजनाचा आग्रह धरला नाही. येडियुरप्पा यांच्या सरकारवर विश्‍वास दर्शवणारा एका वाक्‍याचा ठराव सभापतींनी मांडला अणि त्यावर आवाजी मतदान घेण्यात आले.

सूडाचे राजकारण करणार नाही
विश्‍वासदर्शक ठरावावर बोलताना येडियुरप्पा यांनी सूडाचे राजकारण करणार नसल्याची हमी दिली. “फरगेट ऍन्ड फरगीव्ह’ या तत्वावर आपला विश्‍वास आहे. त्यामुळे सरकारच्या कारभारामध्ये विरोधकांचेही सहकार्य आपल्याला अपेक्षित आहे. राज्यातील प्रशासन यंत्रणा कोलमडली असून ती यंत्रणा पुन्हा प्रस्थापित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आपण मुख्यमंत्री बनणे ही जनतेचीच अपेक्षा होती, असे येडियुरप्पा यांनी म्हटले आहे.

कालच सभापती के.आर. रमेश कुमार यांनी कॉंग्रेसच्या 11 आणि निजदच्या 3 आमदारांना विधानसभेची मुदत संपेपर्यंत अपात्र ठरवले. त्यापूर्वी त्यांनी आणखी तिघांना अपात्र ठरवले होते. त्यामुळे बहुमतासाठी 105 सदस्यांच्या पाठबळाची आवश्‍यकता होती. भाजपकडे बरोबर तेवढे संख्याबळ असल्याने विश्‍वासदर्शक ठराव सहज जिंकला.

कॉंग्रेसकडे 66, धर्मनिरपेक्ष जनता दलाकडे 34 आमदार आहेत. मतांची बरोबरी झाल्यावर सभापती निर्णायक मत देऊ शकतात. पक्षाच्या आदेशानुसार डी. कुमारस्वामी यांना मतदान न केल्यामुळे बसपाने आपल्या एकमेव आमदाराला पक्षातून काढून टाकले आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.