वायसीएममध्ये डाटा एन्ट्री पदासाठी जागा दहा, अर्ज साडेआठशे

बेरोजगारी वाढल्याचे उदाहरण; नोकरीसाठी तरुणांच्या उड्या

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामध्ये डाटा एन्ट्री पदाची भरती करण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने अर्ज मागविण्यात आले. या पदासाठी 10 जागा रिक्त असून त्यासाठी तब्बल साडेआठशे अर्ज दाखल झाले आहेत.

दिवसेंदिवस वाढणाऱ्या बेरोजगारीचे वास्तव पुन्हा एकदा या भरतीमुळे समोर आले आहे. कंत्राटी पद्धतीने भरती होत असलेल्या या जागेसाठी तरुणांच्या अक्षरश: उड्या पडत असून साडेआठशेमधील कोणत्या दहा भाग्यवंतांना संधी मिळणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.

वायसीएममध्ये विविध पदांसाठी कंत्राटी पद्धतीने पदे भरली जात आहेत. सहा महिन्यांसाठी मानधनावर ही पदे भरली जाणार आहेत. वायसीएम रुग्णालयामध्ये डाटा एन्ट्री पदासाठी 10 जागा आहेत. यासाठी प्रशासनाच्या वतीने जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यामध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे होते. त्याची अंतिम मुदत 23 डिसेंबर होती.

अंतीम मुदतीपर्यंत तब्बल 853 जणांनी या पदासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे रिक्त जागा हाताच्या बोटावर मोजण्याइतक्‍या असल्या तरी त्यासाठी शेकडो तरुणांनी अर्ज केले आहेत. या 853 अर्जदारांची परीक्षा घेऊन निवड केली जाणार, असल्याची माहिती वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.