यवतमाळ – शिवसेना दिग्रस महिला उपशहर प्रमुखाच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून एका नगर परिषद कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आत्महत्येपुर्वी या कर्मचाऱ्याने एक व्हिडिओ तयार केला असून यामध्ये त्याने होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती दिली आहे.
अनिल अशोक उबाळे, असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव असून नातेवाईकांनी दिग्रस पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. व्हिडीओमध्ये शिवसेनेच्या दिग्रस उपशहर प्रमुख असलेली महिला आमदार संजय राठोड यांचा धाक दाखवून सात वर्षांपासून पैसे उकळत असल्याचे म्हणले आहे.
अलीकडे या महिलेने पाच लाख रुपयांची मागणी केली. तितकी रक्कम नसल्याने दोन लाख रुपये जमा केले. बाकीचे तीन लाख रुपये देणे शक्य नसल्याचे सांगितले. तरीही छळ थांबला नाही. त्यामुळे आपल्याला आत्महत्या करावी लागत आहे. असेही व्हिडिओत अनिल यांनी सांगितले आहे.
दरम्यान, आत्महत्या करण्यापुर्वी अनिल यांनी आई व काकूंशी संपर्क साधून आपण आत्महत्या करीत असल्याचे सांगितले होते. दोघींनी त्यांना समजावले. तरीही त्यांनी निर्णय बदलला नाही.