यवत – येथील बाजार मैदानातील पालखीतळावर बुधवारी (दि. 27) संजय सखाराम बनकर (रा. तांबेवाडी, खामगाव ता. दौंड, मूळ रा. मुरारजी पेठ, निराळे वस्ती महादेव मंदीराजवळ, चिंचनगर, सोलापूर) यांचा खून झाल्याची घटना घडली होती. याबाबत यवत पोलीस ठाण्यात बनकर यांच्या पत्नी यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास यवत पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषन विभाग पुणे ग्रामीण हे करीत असताना आरोपीचा शोध घेणे करीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निरीक्षक नारायण पवार यांनी चार टिम तयार करून तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरूवात केली होती. पोलीस निरीक्षक नारायण पवार व पोलीस हवालदार नीलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव यांना गोपनीय बातमीदारामार्फत आरोपीची माहिती मिळाली होती.
खुनातील आरोपी हा नेपाळ देशातील रहिवासी आहे, अशी माहिती मिळाल्याने हा दौड रेल्वे स्टेशन येथुन नेपाळला पळून जाणार आहे, अशी माहिती मिळाल्यावरून आरोपीस पकडणे कामी यवत पोलिसांनी दोन दिवस दौंड रेल्वे स्टेशन येथे सापळा रचून शनिवारी (दि. 6) मध्यरात्री राजबहादुर बालुसिंग ठाकुर ऊर्फ राजु सारखी (वय 47, रा. यवत ता. दौंड, मूळ रा. पहाडीपुर, नेपाळ) यास ताब्यात घेतले आहे.
दरम्यान त्याने सांगितले की मी पालखी स्थळावर बसलो असता एकाने दारू पिऊन मला शिवीगाळ केली व माझ्या कानाखाली चापट मारली म्हणुन मी चिडून त्याच्या पोटात चाकु मारून खुन केला असल्याची कबुली दिली. त्यानंतर गुन्ह्याचे तपासकामी आरोपीस अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने गुरुवार (दि. 11) पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.