यवत : देव दर्शनासाठी जाणार्‍या फॉर्च्युनरला अपघात

डाळींब येथे 1 जण ठार तर तीन जण जखमी

यवत (प्रतिनिधी) – डाळींब (ता. दौंड) येथून ढवळेश्‍वर येथे देवदर्शनासाठी चार तरुण फॉर्च्युनर मोटारीमधून जात असताना मोटारगाडी रस्त्याच्या कडेला पलटी होऊन झालेल्या अपघातात एकजण ठार तर तीनजण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवावारी (दि. 26) सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास डाळींब गावच्या हद्दीत स्मशानभूमीजवळ घडला.

या अपघातात नवनाथ बबन म्हस्के (वय 35, रा. डाळींब, ता. दौंड) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. मयत नवनाथ म्हस्के, सागर म्हस्के, राहुल म्हस्के, सुनील म्हस्के असे चौघेजण फॉर्च्युनर गाडी क्रमांक (एमएच 12 एलके 0019) मधून सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान ढवळेश्‍वर येथे देवदर्शन घेण्यासाठी जात होते.

सकाळी फॉर्च्युनर डाळींब गावच्या स्मशानभूमीजवळ आली असता मोटारगाडी रस्ता सोडून डाव्या बाजूकडील खड्ड्यात गेली. यावेळी फॉर्च्युनर गाडी पलटी झाली यावेळी नवनाथ म्हस्के यांच्या डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. तर इतर तीनजण किरकोळ जखमी झाले. या सर्व जखमींना लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. गंभीर जखमी नवनाथ म्हस्के यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेची खबर तानाजी शिवाजी म्हस्के यांनी यवत पोलिसांत दिली. अधिक तपास यवत पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.