सोलापुरात संचारबंदीचा नियम मोडत देवीची यात्रा

18 जण ताब्यात : पुजारी, पोलीस-पाटील, सरपंचाच्या पतीसह 40 जणांवर गुन्हा दाखल
सोलापूर :  राज्यात संचारबंदी असताना दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील नांदणी येथील काही ग्रामस्थांनी लॉकडाऊनचा आदेश मोडत ग्रामदैवत नागम्मा देवीची यात्रा साजरी करण्याबरोबरच धार्मिक प्रथेप्रमाणे अग्नीप्रवेश केला. संचारबंदीचे उल्लंघन केल्याने तसेच तलाठ्याला दमदाटी केल्याप्रकरणी मंद्रूप पोलिसांत 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी 18 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे जिल्हात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदणी येथे नागम्मा देवीच्या मंदिरासमोर दरवर्षी अक्षय तृत्तीय्यानिमित्त यात्रा भरते. त्यानिमित्त अग्निप्रवेश आणि होमहवन आयोजित केले जाते. मात्र सध्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सर्व गावच्या यात्रा, उत्सव, धार्मिक कार्यक्रम व देवस्थान ही बंद करण्यात आले आहेत.

नांदणी येथेही ग्रामपंचायतीने व तलाठ्यांनी गावात दवंडी देऊन संचारबंदी असल्याने मंदिराकडे कोणी येऊ नये व कोणताही धार्मिक विधी करू नये, अशा सूचना दिल्या होत्या. तसेच मंद्रूप पोलिसांनीही तशी नोटीस बजावली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करून काही मंडळींनी रविवारी पहाटे सहा वाजता मंदिरासमोर होमविधी,नागम्मा देवीस महाभिषेक करून धार्मिक विधी करण्यात आला.

या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे, मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप धांडे, उपनिरीक्षक गणेश पिंगूवाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन गावचे माजी सरपंच चिदानंद सुरवसे, पोलीस पाटील महादेव सुरवसे व मंदिराचे पुजारी महालिंगय्या स्वामी यांच्यासह अठरा जणांना ताब्यात घेतले. याबाबत तलाठी अमरसिंग पंतुवाले यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धांडे करीत आहेत.

अन्‌ यात्रेचे बिंग फुटले
करोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने सर्वत्र संचारबंदी सुरू आहे. त्यामुळे यंदा नागम्मा देवीच्या यात्रेस खंड पडणार म्हणून काहीजण चिंतेत होते. त्यामुळे गावातील एका राजकीय युवा नेत्याने आपण मोजकेच जण यात्रा साजरा करू, असे सांगितले. त्या युवा नेत्याच्या शब्दांवर भरोसा ठेवून मंदिराचे पुजारी आणि ग्रामस्थांनी प्रथेप्रमाणे यात्रा साजरा करण्याचा निर्णय घेतला. मात्र गावातील एका युवकाने यात्रेतील घटना आपल्या मोबाईलमधून चित्रीकरण केले आणि यात्रेचे बिंग फुटले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.