विविधा: यशवंतराव चव्हाण

माधव विद्वांस

चारित्र्यसंपन्न कुशल राजकारणी, गुणांची पारख असणारे, साहित्यिक, महाराष्ट्रपुत्र यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती. (निधन 25 नोव्हेंबर 1984) त्यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र येथे झाला. यशवंतराव चव्हाणांचे आजोळ देवराष्ट्र. देवराष्ट्रामध्येच त्यांचे बालपण गेले. त्यांचे वडील बळवंतरावांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मातोश्री विठाई यांनी यशवंतरावांना आपला भाऊ दाजी घाडगे यांच्याकडे पाठविले. ते शेती करून आपली उपजीविका करत असत. त्यांनीच त्यांचा सांभाळ केला.

यशवंतरावांचे मराठी चौथीपर्यंतचे शिक्षण देवराष्ट्र येथील प्राथमिक शाळेत झाले. त्यांच्या गुरूंनी लहान वयात दिलेले प्रेम आणि त्यांनी लावलेली शिस्त ही त्यांना त्यांच्या जीवनात कामी आली. म्हणूनच त्यांना या देवराष्ट्राच्या शाळेबद्दल व गुरुजींबद्दल एक वेगळा जिव्हाळा होता. या गावाबद्दल आपल्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणतात, ‘सज्जनांचा जिव्हाळा आणि सरस्वतीचे सौंदर्य या भूमीला जसे लाभले आहे, तसे तिच्या सद्‌गुणाला चांगुलपणाचे तेज आहे. भव्यत्व आणि दिव्यत्व यांनी इथे परिसीमा गाठली आहे.’ अशा प्रकारे यशवंतरावांनी बालवयातील मंतरलेल्या दिवसांच्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यांचे कृष्णाकाठ हे आत्मचरित्र वाचण्यासारखे आहे, तसेच अनेक व्यक्तींचे भेटीगाठी व व्यक्‍तिमत्त्व यावरही त्यांनी लेखन केले आहे. रत्नागिरी येथे त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचीही भेट घेतली होती.

सामान्यातून जन्मलेल्या या महान व्यक्‍तीचे अजातशत्रू असाच उल्लेख करावा लगेल.त्यांनी गुणग्राहकता राजकीय मतभेदापलीकडे जपली. एकदा वाई येथे प्राज्ञपाठशाळेत लक्ष्मणशास्त्री जोशी यांचेकडे आले होते, तेथून शासकीय मुद्रणालयाकडे त्यांची भेट ठरली होती. केवलानंद सरस्वती यांचा मठ दाखवून ते म्हणाले, मी येथे येत असे. केवलानंद सरस्वती (नारायणशास्त्री मराठे) यांचे मठात अनेक क्रांतिकारक येत असत हे त्यावेळी कळले. विश्‍वकोश कार्यालय त्यांचेमुळेच वाई येथे आले. नाटक, सिनेमा, साहित्य संमेलानातील त्यांची उपस्थिती आवर्जून असे. कार्यकर्त्यांना आलिंगन देऊन आपलेसे करण्याची त्यांची एक आकर्षक कृती असे.

1956 मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (1 मे, 1960) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. 1962 मध्ये चीन युद्धाच्या काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची नेमणूक देशाच्या संरक्षणमंत्री पदावर केली. पुढील काळात त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे यशस्वीरीत्या भूषविली. केंद्रात जनता पक्षाचे सरकार असताना (1977-78) ते विरोधी पक्षनेते होते. तसेच पुढे ते आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्षही झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.