मुंबई : शिवसेना नेते यशवंत जाधव सध्या आयकर विभागाच्या निशाण्यावर आहेत. अशातच आयकर विभागाकडून यशवंत जाधव यांच्याशी संबंधित मालमत्ता जप्त करण्यात आल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्याशी संबंधित 41 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. एका वृत्तवाहिनीने याविषयी माहिती दिली आहे.
मुंबई महापालिकेतील शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्याशी संबंधित 41 मालमत्तांवर आयकर विभागाने टाच आणली आहे. त्यात भायखळ्यातल्या बिलखाडी चेम्बर्स या इमारतीतील 31 फ्लॅट्स आणि वांद्रे इथल्या 5 कोटी रुपये किंमतीच्या एका फ्लॅटचा समावेश आहे. आयकर खात्याने काही दिवसांपूर्वी जाधव यांच्या घरी आणि मालमत्तांवर छापे टाकले होते. या छाप्यात त्यांना मिळालेल्या माहितीनंतर आता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
जानेवारी महिन्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचाही गंभीर आरोपही सोमय्यांनी जाधवांवर केला होता. एवढेच नाहीतर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. शिवसेनेचे नेते आणि मुंबई महापालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि त्यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी कोट्यवधींची उलाढाल केली असल्याचे आयकर विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.