“मी आमदार आहे” म्हणणाऱ्या रवी राणांना यशोमती ठाकूर यांचे उत्तर; “आवाज कमी ठेवा, बोट दाखवायचं नाही”

मुंबई : अमरावती जिल्हा नियोजनाच्या आढावा बैठकीत जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि आमदार रवी राणा यांच्यात चांगलीच शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.  दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत मिळावी ही मागणी रवी राणा यांनी जोर लावून धरली होती. दरम्यान यावेळी बैठकीतच सर्वांसमोर दोघांमध्ये खडाजंगी झाली.

यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्यावर टीका केली असून शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचे  नाटक सोडून लोकप्रतिनिधींशी कसं वागावं हे शिकावं असा टोला लगावला आहे. बैठकी दरम्यान रवी राणा यांनी आपल्याला बोलायचे असल्याचे सांगत आपलं म्हणणं ऐकून घेत नसल्याने आक्षेप नोंदवला. दिवाळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्याची मागणी यावेळी ते करत होते.

दरम्यान त्यांचा वाढलेला आवाज पाहून यशोमती ठाकूर यांनी त्यांना आवाज कमी ठेवा, बोट दाखवायचं नाही असे सांगत संताप व्यक्त केला. यानंतरही रवी राणा यांनी आपलं म्हणणं मांडले. इथे दादागिरी चालणार नाही असेही ते म्हणाले. ठराव घेऊन शासनाला पाठवावा अशी मागणीही यावेळी त्यांनी केली.

रवी राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यातील वाद विकोपाला गेल्याने जिल्ह्यात मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान रवी राणा यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू होण्याआधी भवनाच्या बाहेरच कुजलेले सोयाबीन जाळत, संत्री, कुजलेले सोयाबीन फेकून देत राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर बैठक सुरू झाली असता यशोमती ठाकूर आणि आमदार रवी राणा यांच्यात शाब्दिक चकमक झाली.

बैठकीनंतर बोलताना रवी राणा यांनी, फक्त देखावा म्हणून ही बैठक आयोजित केली असल्याची टीका केली. शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली तर शेतकरी मातोश्रीवर जातील आणि उद्धव ठाकरेंची दिवाळी साजरी होऊ देणार नाहीत असा इशारा यावेळी त्यांनी दिली.

तर दुसरीकडे  “अमरावतीच्या इतिहासाला काळीमा फासण्याचा प्रकार आज घडला आहे. अमरावतीचा इतिहास अशी स्टंटबाजी, चिल्लरगिरी आणि थिल्लरगिरीचा नाही. अमरावती जिल्हा आणि नागरिकांवर माझा विश्वास असून ते खऱा न्याय देतील असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.