नवी दिल्ली : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) महासंचालकपदी म्हणजेच प्रमुखपदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी ज्ञानेंद्रप्रताप सिंह यांची नियुक्ती करण्यात आली. सध्या ते आसामच्या पोलीस प्रमुखपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
याआधीचे सीआरपीएफ प्रमुख अनिशदयाल सिंह सरलेल्या वर्षाच्या अखेरीस सेवानिवृत्त झाले. त्यामुळे वरिष्ठ आयपीएस अधिकारी वितुल कुमार यांच्याकडे त्या पदाचा तात्पुरता कार्यभार सोपवण्यात आला. आता महासंचालक पदी पूर्णवेळ नियुक्ती करण्यात आली आहे. त्या नियुक्तीला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीने मंजुरी दिली.
सेवानिवृत्तीपर्यंत म्हणजे 30 नोव्हेंबर 2027 पर्यंत सिंह सीआरपीएफची धुरा सांभाळतील. ते भारतीय पोलीस सेवेच्या (आयपीएस) 1991 मधील तुकडीतील आसाम-मेघालय केडरचे अधिकारी आहेत. सीआरपीएफ हे देशातील महत्वाचे निमलष्करी दल आहे.