पिंपरी (प्रतिनिधी) – रूपीनगर परिसरात करोना विषाणुचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर लगतच्या प्रभाग क्रमांक 13 मधील यमुनानगर, निगडी, साईनाथनगर, पेठ क्रमांक 22 आदी परिसरात शुक्रवारपासून (दि. 1) रविवारपर्यंत (दि. 3) नागरिकांकडून कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.
रुपीनगर परिसरात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे हा परिसर “हॉटस्पॉट’ ठरत आहे. या पार्श्वभूमीवर यमुनानगर, निगडी, साईनाथनगर, पेठ क्रमांक 22 हा रुपीनगरलगतचा परिसर असल्याने नागरिक आणि नगरसेवकांनी कोणताही उशिर न करता हा प्रतिबंधात्मक निर्णय घेतला आहे. बंद काळात रूग्णालये, दुध डेअरी आणि मेडिकल खुले ठेवण्यात येणार आहे. किराणा दुकाने, भाजीपाला व फळ विक्री बंद ठेवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेविका सुमन पवळे, कमल घोलप, सचिन चिखले व प्रा. उत्तम केंदळे यांनी केले आहे.
निगडी प्रभागातील स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी यांनी महापालिका प्रशासनासोबत आणि निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जावदवाड यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. तसेच त्याबाबतचे निवेदन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहे. दरम्यान, स्पाइन रस्त्याने साईनाथनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पत्रे ठोकण्यात आले आहेत. तसेच, स्पाइन रस्त्यावरून त्रिवेणीनगरकडे जाणाऱ्या मार्गावर ड्रेनेजचे रिकामे पाईप टाकले आहे. त्या माध्यमातून हा रस्ता देखील अडविला आहे.