मुंबई – अभिषेक बच्चनने अलीकडेच आपल्या “दसवीं’ या आगामी सिनेमाचे पोस्टर रिलीज केले आहे. त्याच्यापाठोपाठ यामी गौतमनेही याच सिनेमाचे पोस्टर रिलीज केले आणि त्यातील आपला फर्स्ट लुक प्रेक्षकांसमोर आणला आहे. यामीला चक्क पोलीस अधिकारी महिलेच्या युनिफॉर्ममध्ये बघून कित्येकांना आश्चर्याचा धक्काच बसला असेल.
“दसवीं’मध्ये यामीच्या व्यक्तिरेखेचे नाव ज्योती देसवाल असे असेल. “दसवीं’चे शुटिंग सुरू झाले, असेही यामीने इन्स्टाग्रामवरच्या आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तर अभिषेक बच्चन प्रौढ आणि दाढीवाल्या व्यक्तीच्या रोलमध्ये दिसणार आहे. त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याच्या या लुक बरोबर इयत्ता दहावीची मार्कशीटदेखील दिसते आहे.
त्या गुणपत्रिकेवर इंग्लिश, हिंदी, गणित, सायन्स, इतिहास, भूगोल, संस्कृत आदी विषयांची नावे आणि त्यापुढे मिळवलेल्या मार्कांचे आकडेही दिसत आहेत. “हिंदी मीडियम’, “अंग्रेजी मीडियम’ आणि “बाला’च्या निर्मात्यांनीच “दसवीं’ची निर्मिती केली आहे. अभिषेक बच्चन आणि यामी गौतम यांच्या बरोबर निमरत कौरदेखील या सिनेमात असणार आहे.
यामीचा “भूत पोलीस’ याच वर्षी सप्टेंबरमध्ये रिलीज होणार आहे. त्यात तिच्याबरोबर सैफ अली खान, अर्जुन कपूर आणि जॅकलीन फर्नांडिसही असणार आहेत.