पुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घरातच थांबून प्रशानसनाला सहकार्य करावे म्हणून प्रबोधन करण्यासाठी स्वारगेट पोलिसांनी चक्क यमराजाला रस्त्यावर उतरविले.
जेधे चौक, महर्षीनगर, मुकूंदनगर, लक्ष्मीनाराय चौक या परिसरात यमराज यांनी रेड्यासह फिरून नागरिकांनो घरातच थांबा, मास्क घाला, हात धुवा, फिजिकल डिस्टन्स पाळा असा संदेश देत जनजागृती केली. जर तुम्ही या नियमांचे पालन न करता घराबाहेर पडलात तर मी आहेच रस्त्यावर तुम्हाला माझ्यासोबत घेऊन जायला…यम है..हम, हा..हा…हा.. असे म्हणत कोरोनाचे गांभिर्य लक्षात आणून दिले.
यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त सर्जेराव बाबर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी, पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद आदी उपस्थित होते.
याबाबत बोलताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी म्हणाले की, कोरोनाच्या लढ्यात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. संसर्ग रोखायचा असेल तर त्यांनी अनावश्यक घराबाहेर फिरणे टाळले पाहिजे. त्यामुळे जनजागृती व्हावी या हेतूने प्रतिकात्मक यमराजला शहरातील रस्त्यावर उतरविण्यात आले होते.
दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात बंदोबस्ता बरोबरच नागरिकांना मदत करण्यासह शहर पोलिस दलाकडून विविध प्रकारचे उपक्रम राबवित नागरिकांमध्ये कोरोनाच्या बाबतीत जनजागृती केली जात असल्याचे दिसून येते.