जेसीबी खरेदीच्या बहाण्याने घेतले कर्ज
पिंपरी – एका खातेदाराने जेसीबी खरेदीच्या बहाण्याने दि वाई अर्बन को ऑप बॅंकेची 34 लाखांची फसवणूक केली. हा प्रकार बॅंकेच्या थेरगाव शाखेत 25 ऑक्टोबर 2016 ते 2 जून 2017 या कालावधीत घडला. याबाबत 10 फेब्रुवारी 2021 रोजी गुन्हा दखल करण्यात आला आहे.
सचिन प्रभाकर येवले (रा. चाकण) असे आरोपी खातेदाराचे नाव आहे. याबाबत पुष्कराज चंद्रकांत मापारी (वय 49, रा. सिंहगड रोड, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी येवले याने Universal construction Eqipment या फर्मचे बनावट बॅंक खाते ऍक्सिस बॅंकेच्या वारजे शाखेत उघडले. त्यानंतर फर्मच्या नावे जेसीबी खरेदीसाठी कोटेशन दि वाई अर्बन को ऑप बॅंकेच्या थेरगाव शाखेत सादर केले.
बॅंकेचा विश्वास संपादन करून बॅंकेकडून 22 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. त्यातून जेसीबी (एमएच-14-सीएम-1561) खरेदी केला. त्यानंतर दुसरा जेसीबी खरेदी करण्यासाठी बॅंकेकडून 21 लाखांचे कर्ज मंजूर करून घेतले. मात्र दुसरा जेसीबी खरेदी न करता कर्जाची रक्कम स्वतःच्या फायद्यासाठी अमित एंटरप्रायजेस या फर्मच्या खात्यावर वर्ग करून घेतली.
त्या रकमेचा आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला. पहिल्या जेसीबीच्या काही हप्ते भरले. त्यातील उर्वरित रक्कम आणि दुस-या जेसीबीसाठी घेतलेली कर्जाची रक्कम अशी एकूण 34 लाख रुपयांची फसवणूक केली.