जालन्यात शिक्षकासह आठ जणांना घेतले ताब्यात
जालना : राज्यात बारावीच्या परीक्षांना प्रारंभ झाला असून एका शिक्षकानेच पेपर फोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जालन्यातील परतूर येथे घडला. यामुळे तालुक्यासह राज्यात मोठी खळबळ माजली. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षकासह आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
कृष्णा चव्हाण (वय 19), दिनेश तेलगड (34), रामेश्वर उबाळे (22), विषवभर पाष्टे (19), श्याम उबाळे (19), शुभम मुळे (18), ज्ञानेश्वर माने (18) यांच्यासह परीक्षा हॉल क्रमांक 20 च्या पर्यवेक्षकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जालना जिल्ह्यातील परतूर येथील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयात बारावीची प्रश्नपत्रिका शिक्षकाकडूनच बाहेर पाठवल्या गेल्याचा प्रकार समोर आला आहे. हा शिक्षक झेरॉक्स सेंटर चालकाला व्हॉट्सऍपवरून प्रश्नपत्रिका पाठवायचा. तिथून काही जणांचा गट विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचे काम करायचे.
बारावीच्या हिंदी विषयाची प्रश्नपत्रिका बाहेर आणून त्याची उत्तरे लिहिली गेली. त्यानंतर झेरॉक्स मशीनमध्ये त्याच्या प्रति काढून विद्यार्थ्यांना पुरवण्यात आल्याचा आरोप आहे. प्रश्नपत्रिका व्हॉटसऍपवरुन बाहेर पाठवल्या जात असल्याची माहिती मिळताच आयपीएस अधिकारी निलेश तांबेंसह परतूर पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
पेपर फोडल्याप्रकरणी आठ जणांवर परतूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर भांदवी 188 कलम 5, 6, 7 महाराष्ट्र विद्यापीठ बोर्ड गैरव्यवहार प्रतिबंध अन्वये गुन्हा दाखल झाला असून शिक्षकासह आठ जणांना परतूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.