#WTC21 | चौथ्या दिवशीही पावसाचाच खेळ

साउदम्पटन  – जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेच्या भारत व न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामन्यात क्रिकेटपटूंच्या कामगिरीपेक्षा संततधार पावसाचीच मक्‍तेदारी दिसत आहे. सोमवारी चौथ्या दिवशी सातत्याने पाऊस पडत राहिल्यामुळे पंचांनी संपूर्ण दिवसाचाच खेळ रद्द केला. पाऊस कधी थांबणार या विवंचनेत वेळ घालवण्यापेक्षा टेबल टेनिस खेळण्यात न्यूझीलंडचे खेळाडू रमले. आता हा सामना अनिर्णित राहणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे.

रविवारी भारताचा पहिला डाव 217 धावांवर संपल्यावर न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात 2 बाद 101 धावा केल्या होत्या. ते 116 धावांनी पिछाडीवर आहेत. या सामन्याचा पहिला दिवस पावसाने वाया गेला होता, त्यामुळे सहावा राखीव दिवस उपलब्धही झाला आहे. मात्र, या कसोटी सामन्याच्या प्रत्येक दिवशी पावसाने अनेकदा व्यत्यय आणला आहे. मात्र, काही वेळाने सामना सुरूदेखील झाला होता. त्यात भारताचा पहिला डाव पूर्ण झाला असून, न्यूझीलंडचा डाव सुरू आहे.

रविवारी रात्रीपासून सोमवारचा संपूर्ण दिवस संततधार पावसामुळे खेळपट्टी व आउटफील्डची पाहणी करण्यासाठीही पंचांना मैदानात उतरता आले नाही. अखेर मैदानावर साचलेले पाणी तसेच संततधार पाऊस यामुळे संपूर्ण दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. या काळात खेळ सुरू होणार का, याची वाट भारतीय क्रिकेटपटू पाहात होते, तर दुसरीकडे न्यूझीलंडचे खेळाडू मात्र मैदानातील क्‍लबहाऊसमध्ये टेबल टेनिस खेळण्याचा आनंद लुटत होते.

आता या सामन्याचे राखीव दिवस धरून दोनच दिवस बाकी राहिले असून, हा सामना अनिर्णित राहणार असल्याचेही स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे पहिल्याच जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेचे भारत व न्यूझीलंड यांना संयुक्‍त विजेतेपद देण्यात येणार हेदेखील स्पष्ट होत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.